गेल्या काही दिवसांपासून सत्ताधाऱ्यांकडून महापुरूषांबाबत होत असलेली आक्षेपार्ह वक्तव्य आणि राज्यातील इतर प्रश्नांवर महाविकास आघाडीतर्फे उद्या महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मित्रपक्ष देखील सहभागी होणार आहेत. हा मोर्चा शांततेत आणि नियमांचे पालन करुन काढावा असे निर्देश पोलिसांनी दिले आहेत.
महाविकास आघाडीच्या या मोर्चावर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महापुरुषांबद्दल वक्तव्य करणाऱ्या विरोधात मोर्चा काढत असेल तर ते चांगलंच आहे. महापुरुषांबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर त्याला रट्टा दिला पाहिजे, असं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलं आहे. राज्यपालांनी पुन्हा असं वादग्रस्त विधान करु नये, तसेच राज्यातील इतर नेत्यांनी देखील महापुरुषांबद्दल बोलताना सांभाळून बोलण्याचा सल्ला बच्चू कडू यांनी दिला.
दरम्यान, महाविकास आघाडीकडून उद्या हल्लाबोल महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी जय्यत तिन्ही पक्षांकडून तयारी करण्यात आली आहे. भायखळ्यातील रिचर्डसन्स ॲंड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आलंय. या संपूर्ण रस्त्यात तिन्ही पक्षांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. भायखळा ते टाइम्स बिल्डिंगपर्यंत साडे तीन किलोमिटरचं हे अंतर आहे.
महाविकास आघाडीला भाजपाही प्रत्युत्तर देणार-
मविआकडून आयोजित केलेल्या मोर्चाला भाजपाही रस्त्यावर उतरुन उत्तर देणार आहे. महापुरुषांच्या अपमानावर बोलणारे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुषमा अंधारेंनी वारकऱ्यांच्या अपमानाबाबत गप्प का आहेत? तसंच खासदार संजय राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थानाचा चुकीचा उल्लेख केला. त्याबाबत काही बोलणार आहात का? आता आम्हीही 'मविआ'ला रस्त्यावर उतरुनच उत्तर देऊ. उद्या मुंबई भाजपाकडून ठिकठिकाणी 'माफी मांगो' आंदोलन केलं जाईल. मविआच्या मोर्चाला काळे झेंडे दाखवले जातील. मुंबईतील सहा विभागातील खासदार, आमदार यात सहभाही होतील, असं भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी सांगितलं.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"