- राज चिंचणकर, मुंबई
गेल्या वर्षी ठाणे येथे आयोजित ९६व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी त्यांच्या भाषणात, नाट्य सृष्टीतल्या त्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या बोलीभाषेतल्या ‘वस्त्रहरण’ या विक्रमी नाटकाला दिले होते. त्याच वेळी बोलीभाषेतली नाटके किंवा एकांकिका रंगभूमीवर मोठ्या प्रमाणात सादर व्हायला पाहिजेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती. गंगाराम गवाणकर यांच्या याच अपेक्षेला ज्येष्ठ नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, ‘बोलीभाषा’ एकांकिकांच्या रूपाने व्यासपीठ निर्माण करून नाट्य संमेलनाध्यक्षांच्या ‘बोली’ची अपेक्षापूर्ती केली आहे.विद्यमान नाट्य संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्या त्या भाषणातला मुद्दा लक्षात ठेवत गोविंद चव्हाण यांनी या ‘बोलीभाषा’ एकांकिकेचा घाट घातला. अनेक मालिका आणि चित्रपट हे निव्वळ त्यातल्या बोलीभाषेमुळे गाजले असल्याने, बोलीभाषेचा हा फॉर्म रंगभूमीवर का येऊ नये, असा विचार मनात आल्यावर त्यांनी या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचे नक्की केले. गेली १६ वर्षे त्यांची ‘सुप्रिया प्रॉडक्शन’ ही नाट्यसंस्था रंगभूमीवर विविध नाटकांद्वारे कार्यरत आहे. बोलीभाषा स्पर्धेची धुरा त्यांनी त्यांची मुलगी सुप्रिया चव्हाण हिच्या खांद्यावर दिली आहे. संस्थेकडे प्राथमिक फेरीसाठी महाराष्ट्रातून ४५ एकांकिका आल्या आहेत. यातून १० एकांकिका अंतिम फेरीत निवडल्या जाणार आहेत. स्पर्धेची २२ व २३ एप्रिल रोजी प्राथमिक आणि २ मे रोजी अंतिम फेरी होणार आहे. यातून तीन एकांकिकांची सर्वोत्कृष्ट एकांकिका म्हणून निवड होणार आहे. चौथ्या क्रमांकासाठी उत्तेजनार्थ पारितोषिकाऐवजी लक्षवेधी एकांकिकेची निवड करण्यात येणार आहे. ज्येष्ठ रंगकर्मींच्या स्मृतींची जपणूक...बोलीभाषा एकांकिका स्पर्धेत, ‘सुप्रिया प्रॉडक्शन’ या संस्थेत ज्या रंगकर्मींनी कामे केली आणि त्यातले जे रंगकर्मी हयात नाहीत, त्यांच्या स्मरणार्थ कायमस्वरूपी पारितोषिके देण्यात येतील. या अंतर्गत विनय आपटे स्मृती (सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक), कुलदीप पवार स्मृती (सर्वोत्कृष्ट अभिनेता), सतीश तारे स्मृती (सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता), प्रियंका शहा स्मृती (सर्वोत्कृष्ट अभिनेत्री), अरुण कानविंदे स्मृती (सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत) आदी पारितोषिकांचा समावेश आहे.