मुंबई : एसटीमधील वाहकांकडून प्रवाशांना अतिरिक्त तिकिटे दिल्याची मोठी डोकेदुखी एसटी प्रशासनाला सहन करावी लागत आहे. महिन्याला सुमारे ५ हजारांहून अधिक अतिरिक्त तिकिटे दिल्याची माहिती समोर ठेवत एसटीने यामध्ये काही गैरव्यवहार तर होत नाही ना, याची उलटतपासणी करण्याचे आदेश विभाग नियंत्रकांना दिले आहेत.या वर्षी एसटीमधील वाहकांनी प्रवाशांना जानेवारी महिन्यात ५ हजार ११ आणि फेब्रुवारीमध्ये ५ हजार २१५ अतिरिक्त तिकिटे दिल्याची माहिती आहे. अतिरिक्त तिकिटे देण्याच्या कारणामुळे काही ठिकाणी वाहकांनी अपहार केल्याची प्रकरणे घडल्यामुळे प्रशासनाने याबाबतीत गंभीर दखल घेतली आहे. तसेच प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मोठ्या संख्येने अतिरिक्त तिकिटे दिल्याने व त्यावर नियंत्रण न ठेवल्याने अपहार करण्यासाठी वाहकांना संधी मिळत असल्याची भीतीही प्रशासनाने व्यक्त केली आहे. म्हणूनच वाहकांकडून देण्यात येणाऱ्या कारणांची उलटतपासणी करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.अहवाल सादर करण्याचे आदेशअतिरिक्त तिकिटे देण्याची वेळ नव्या प्रणालीमुळे येता कामा नयेत, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. या प्रकरणी वाहकांनी दिलेली कारणे तसेच वैधता तपासल्यानंतर येणारा अहवाल तातडीने मध्यवर्ती कार्यालयात सादर करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
एसटीला अतिरिक्त तिकिटांची डोकेदुखी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 5:48 AM