मुंबई: मुंबईवरील हल्ल्याच्या खटल्याप्रकरणी ‘माफीचा साक्षीदार’ असलेला अमेरिकेचा नागरिक डेव्हिड हेडलीच्या उलटतपासणीस २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. फेब्रुवारीत त्याची विशेष सरकारी वकिलांनी सरतपासणी घेतली होती.हेडलीला २६/११ हल्ल्याचा हॅन्डलर आणि मुंबईत आलेल्या दहा अतिरेक्यांना हिंदी शिकवणारा व सूचना देणारा अबू जुंदाल याच्या खटल्यात साक्षीदार म्हणून बोलवले आहे. त्यामुळे जुंदालचे वकील आता हेडलीची उलटतपासणी घेतील. ही उलटतपासणी २२ मार्च ते २५ मार्चपर्यंत चालण्याची शक्यता आहे.सरतपासणीदरम्यान हेडलीने खळबळजनक माहिती दिली होती. भारतावर हल्ले करण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय पाकिस्तानातील सर्व दहशतवादी संघटनांना आर्थिक, लष्करी आणि नैतिक बळ पुरवत असल्याचे हेडलीने विशेष न्यायालयाला सांगितले होते. तसेच इशरत जहाँ बनावट एन्काऊंटरप्रकरणीही हेडलीने खळबळजनक खुलासा केला होता. इशरतही लष्कर-ए-तोयबाच्या महिला विंगमध्ये काम करत होती. गुजरातमध्ये पोलिसांशी चकमक करण्यासाठी ती तिथे गेल्याचेही हेडलीने न्यायालयाला सांगितले होते. (प्रतिनिधी)
हेडलीची उलटतपासणी होणार २२ मार्चपासून
By admin | Published: March 11, 2016 4:16 AM