मुंबई : २६/११च्या हल्ल्यासाठी मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी करणाऱ्या डेव्हीड हेडलीची आता चार दिवस उलटतपासणी घेणार असल्याची माहिती अबु जुंदालच्या वकिलांनी विशेष न्यायालयाला दिली. अमेरिकेतील योग्य त्या प्रशासनाशी याबाबत संवाद साधून, हेडलीच्या उलटतपासणीची तारीख निश्चित करण्याचे निर्देश विशेष न्यायालयाने सरकारला दिले आहेत. हेडलीची उलटतपासणी घेण्यासाठी बचावपक्षाच्या वकिलांना किती दिवस लागणार? हे जाणण्यासाठी न्या. जी. ए. सानप यांनी ही सुनावणी तहकूब केली होती. हेडलीची उलटतपासणी करण्यासाठी चार दिवस लागतील, अशी माहिती सोमवारी बचावपक्षाच्या वकिलांनी न्या. सानप यांना दिली. त्यावर न्यायाधीशांनी अॅड. उज्ज्वल निकम यांना अमेरिका प्रशासनाशी चर्चा करून, हेडलीच्या उलटतपासणीचा दिवस निश्चित करून, २५ फेब्रुवारीपर्यंत माहिती देण्याचे निर्देश दिले.मुंबईवर हल्ला करणाऱ्या दहा दहशतवाद्यांना हिंदी शिकवणाऱ्या आणि कराचीमधून मुंबईतील अतिरेक्यांना हल्ल्याची माहिती दिल्याचा आरोप अबु जुंदालवर आहे. या प्रकरणी माफीचा साक्षीदार असलेला हेडली अमेरिकेत ३५ वर्षांची कारावासाची शिक्षा भोगत आहे. (प्रतिनिधी)
हेडलीची उलटतपासणी चालणार ४ दिवस
By admin | Published: February 23, 2016 2:50 AM