- मुकुंद पाटील। लोकमत न्यूज नेटवर्क
भोयणी (जि. वाशिम) : मानोरा तालुक्यातील भोयणी आरोग्य उपकेंद्रात प्रसुतीदरम्यान दोन नवजात बाळांचा मृत्यू झाला. त्यानंतर येथे जन्मलेले बाळ जगत नाही, अशी अंधश्रद्धा पसरली. त्यामुळे बाळंतपणाला महिला येईना. पंचक्रोशीतील ही अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आरोग्यसेविका यू. जी. मानकर सरसावल्या अन् पायपीट करून त्यांनी अंधश्रद्धेचे भूत उतरविले!चार वर्षांपूर्वी आरोग्य उपकेंद्रात दोन महिलांच्या प्रसुतीनंतर बाळ मृत्यू पावल्याच्या घटना घडल्या. एका पाठोपाठ घडलेल्या या दोन घटनांमुळे परिसरात वेगळीच चर्चा सुरू झाली. उपकेंद्राच्या परिसरात दुष्टशक्ती कार्यरत असून, त्यामुळेच नवजात बाळांचा मृत्यू झाल्याची अंधश्रद्धा पसरली. त्यानंतर लोकांनी उपकेंद्राकडे पाठ फिरवली. २0१२ पासून येथे एकही महिला प्रसुतीसाठी आली नाही. लोकांच्या मनातील अंधश्रद्धा दूर करण्याचे मोठे आव्हान होते. चार महिन्यांपूर्वी उपकेंद्रात यू. जी. मानकर या आरोग्यसेविका रुजू झाल्या. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून अंधश्रद्धा दूर करण्याचे आव्हान स्वीकारले. कार्यक्षेत्रातील गावागावांत भेटी देऊन त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. ग्रामस्थांच्या गट सभा घेतल्या. महिला, पुरुषांना बोलावून वारंवार मार्गदर्शन केले आणि आरोग्य सुविधांचा फायदा घेण्याचे आवाहन केले. मानकर यांच्या मार्गदर्शनाचा परिणाम झाला. परिणामी गेल्या चार वर्षांनंतर या उपकेंद्रात तीन महिलांची सुखरूप प्रसुती झाली. लोकांच्या मनातील अंधश्रद्धेचे भूत पळविण्यासाठी मानकर यांना वैद्यकीय अधिकारी बी. एस. राठोड, प्रभारी आर. एस. ठाकूर यांनी मदत केली.