- अतुल कुलकर्णी, मुंबई
‘लोकमत’ने उघडकीस आणलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागातील मनमानी औषध खरेदी प्रकरणी या विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार यांना शासनाने तडकाफडकी निलंबित केले आहे. तशी घोषणा सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधान परिषदेत केली. आरोग्य संचालक पदावरील व्यक्ती निलंबित होण्याची ही पहिलीच वेळ असून, या प्रकरणातील हे तिसरे निलंबन आहे. २९७ कोटींच्या औषध खरेदीतील घोटाळा आरोग्यमंत्र्यांनी मान्य केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या प्रतिमेला मोठा तडा गेला आहे. या प्रकरणी प्रधान सचिव भगवान सहाय यांची एक सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती एक महिन्याच्या आत अहवाल सादर करेल. त्यानंतर या प्रकरणाची निवृत्त न्यायमूर्र्तींमार्फत चौकशी केली जाईल, असेही डॉ. सावंत यांनी जाहीर केले.सार्वजनिक आरोग्य विभागाने केलेल्या मनमानी औषध खरेदीचे प्रकरण मंगळवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत चांगलेच गाजले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी विधानसभेत, तर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत हा विषय उपस्थित करत आरोग्यमंत्र्यांना धारेवर धरले. अप्रमाणित औषधांचा साठा आढळल्यानंतर त्याची माहिती एफडीएला न देता तो साठा घेऊन जा, असे विनंती करणारे पत्र संबंधित कंपन्यांना लिहिणाऱ्या वाशिमच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेखा मेंढे यांना निलंबित करण्यात आले असून, त्यांनाही या चौकशी समितीला सामोरे जावे लागेल, असे आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी जाहीर केले.आजवर मनमानी खरेदीचा इन्कार करणाऱ्या आरोग्यमंत्र्यांनी मंगळवारी विधान परिषदेत मात्र एवढी खरेदी झाल्याचे मान्य केले. ही खरेदी एनएचएम, एनयूएचएम आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातून झाल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र शासनाचा निधी असल्यामुळे खरेदीच्या जाहिराती राज्यातल्या दोन सर्वाधिक खपाच्या वर्तमानपत्रांत आणि देशातल्या एका मोठ्या इंग्रजी दैनिकात द्यावी, अशी अट असताना दिब्रुगड, सिक्कीम, जम्मू येथील वर्तमानपत्रात का दिल्या? याचीही चौकशी होणार आहे. बेंझाल कोनियम क्लोराईड औषध खरेदीच्या टेंडरला स्थगिती दिली असून, त्यात चुकीचे काही होऊ दिले जाणार नाही, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांची ग्वाही‘लोकमत’ने यापूर्वी आरोग्य विभागातील खरेदीसंबंधी मालिका लिहिली होती, त्यानंतर तत्कालीन आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी खरेदीचे धोरण बनवले होते. ते धोरण अत्यंत चांगले होते, असे सांगून त्या धोरणात कोणताही बदल केला जाणार नाही, अशी ग्वाही आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली.‘लोकमत’चे दोन्ही सभागृहांत अभिनंदन!२९७ कोटींच्या औषध खरेदीतील घोटाळा ‘लोकमत’ने रविवार, १० एप्रिल रोजी उघडकीस आणला. त्याचे तीव्र पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत उमटले. एखाद्या बातमीवर दोन्ही सभागृहांत अंतिम आठवड्यात प्रस्ताव येण्याची ही पहिलीच वेळ होती. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लोकमत आणि अतुल कुलकर्णी यांचे तर विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे प्रकरण उघडकीस आणल्याबद्दल लोकमतचे अभिनंदन केले!