ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. २२ - राज्यभरासह मुंबई व उपनगरांत गेल्या तीन दिवसांपासून सतत पडणा-या पावसामुळे सामान्य नागरिक त्रस्त झालेले असतानाच या पावसाचा फटका राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनाही बसला. पावसामुळे मुंबई – अहमदाबादला जोडणारा वर्सोवा पूल बंद पडला असूव शिळफाटा परिसरात वाहतूक कोंडी झाली असून सावंत तेथेच बराच काळ अडकले होते. बराच काळ ट्रॅफिक जॅममध्ये अडकलेल्या दीपक सावंत यांनी अखेर चालत जाणं पसंत केलं. दोन किलोमीटरची वाट तुडवल्यानंतर पुढे वाहतूक कोंडी सुटलेली दिसल्यावर सावंत यांचा पुढे जाण्याचा मार्ग सुकर झाला. मात्र त्यानंतर सावंत यांनी खारेगाव टोलनाका आज दुपारी ४ पर्यंत टोलमुक्ती करण्याची घोषणा केली.
दरम्यान मुंबईसह उपनगरातही पावसाची जोरदार बॅटींग सुरु आहे. वांद्रे, अंधेरी आणि गोरगाव तसेच ठाणे आणि नवी मुंबईतही रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला असून त्याचा परिणाम रेल्वे व रस्ते वाहतुकीवरही झाला आहे. मध्य रेल्वेवरील लोकल सुमारे अर्धा तास उशीराने धावत असून चाकरमान्यांना बराच त्रास सहन करावा लागत आहे.