मुंबई: गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं होणारी वाढ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रशासनाला लॉकडाऊनच्या उपाययोजना करण्याचे दिलेले आदेश, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा लॉकडाऊनला असलेला विरोध या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. लॉकडाऊन कोणालाही आवडत नाही. पण तहान लागल्यावर विहीर खणायची नाही. त्यामुळेच लॉकडाऊनची पूर्वतयारी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्याचं त्यांनी सांगितलं. (health minister rajesh tope on rising corona cases and lockdown preparation)"लॉकडाऊन पर्याय होऊ शकत नाही", भाजपपाठोपाठ आता राष्ट्रवादीचाही लॉकडाऊनला विरोध!दोन दिवसांपासून राज्यात रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री ठाकरेंनी प्रशासनाला लॉकडाऊनची तयारी करण्याचे आदेशदेखील दिले आहेत. याबद्दल आरोग्यमंत्र्यांनी सविस्तर माहिती दिली. 'गेल्या वर्षी लॉकडाऊन केल्यावर स्थलांतरित मजुरांचे प्रचंड हाल झाले. तशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पूर्वतयारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असेल. लॉकडाऊनचा निर्णय घेतला गेला तरी त्याचं स्वरुप गेल्या लॉकडाऊनसारखं नसेल. कठोर लॉकडाऊन केला जाणार नाही,' असं टोपेंनी सांगितलं.'मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन म्हणताच द्राक्षांचा दर 50 रुपयांवरुन 25 वर आला'लॉकडाऊनचा निर्णय घेतला गेल्यास तो नेमका कधी घेतला जाणार, असा प्रश्न टोपेंनी विचारण्यात आला. त्यावर लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असल्याचं उत्तर आरोग्यमंत्र्यांनी दिलं. 'दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्यास, पुढील काही दिवसांत आरोग्य सुविधा, बेड्स कमी पडतील, अशी परिस्थिती निर्माण झाल्यावरच लॉकडाऊनचा विचार होऊ शकतो. आयसीयू, ऑक्सिजन बेड्स कमी पडतील, अशी शक्यता निर्माण झाल्यावरच याबद्दलचा निर्णय घेतला जाईल,' असं टोपे म्हणाले.राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी कालच लॉकडाऊन उपाय नसल्याचं म्हणत विरोध दर्शवला. त्यावर मंत्रिमंडळातून विरोध होत असला तरी परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे लागतात, असं टोपे म्हणाले. अर्थकारणाला धक्का लागणार नाही आणि नागरिकांचं आरोग्यदेखील जपलं जाईल अशा अनुषंगानं सुवर्णमध्य काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. नागरिकांनी नियम पाळले, तर लॉकडाऊनची गरजदेखील भासणार नाही. सध्या गर्दीच्या ठिकाणी निर्बंध आणखी कठोर करण्यावर भर देण्याचा विचार सुरू आहे, असं टोपे यांनी सांगितलं.
CoronaVirus Lockdown News: ...तेव्हा लॉकडाऊनचा विचार करू; आरोग्य मंत्र्यांनी सांगितली मोठ्या निर्णयाची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 3:07 PM