मुंबई - कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर गेल्या एक दोन महिन्यांमध्ये राज्यातील जनजीवन पूर्वपदावर येत होते. मात्र गेल्या काही दिवसांत मुंबईसह महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या अचानकपणे वाढल्याने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांनी मंगळवारी विधानसभेत राज्यातील कोरोनाच्या स्थितीबाबत चिंतेत भर घालणारी माहिती दिली आहे. महाराष्ट्रामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते, अशी भीती राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.
राज्यातील कोरोनास्थितीबाबत माहिती देताना राजेश टोपे म्हणाले की, राज्यात आतापर्यंत १६७ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. आज राज्यात कोरोना रुग्णवाढीचा जो ६००-७०० दरम्यान आकडा होता तो एकदम वाढला आहे. राज्यात १६०० नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे गती अशीच वाढत गेली तर ओमायक्रॉनचा रुग्णदुप्पटीचा वेग हा एक-दोन दिवसांचा आहे. आज रुग्णसंख्या कमी असल्याने तो आकडा कमी दिसत आहे. मात्र रुग्णसंख्या वाढली तर रुग्ण दुपटीचे प्रमाण वेगाने वाढून मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ होईल आणि जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ दिसून येईल. त्यामुळे ओमायक्रॉनच्या संदर्भात आपण सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे, असं आवाहनही राजेश टोपे यांनी यावेळी केले.
राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली तर ती ओमायक्रॉनचीच असेल, अशी भीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. त्यानंतर आता आरोग्यमंत्र्यांनी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात राज्यात कोरोना रुग्णवाढ होईल, अशी भीती व्यक्त केल्याने चिंता वाढली आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असून, काल राज्यात तब्बल २ हजार १७२ कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर मुंबईत मंगळवारी १ हजार ३७७ कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या शहर उपनगरात ५ हजार ८०३ रुग्ण उपचाराधीन आहेत. सोमवारी मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ९६७ दिवसांवर होता. मंगळवारी हे प्रमाण ८४१ दिवसांवर आले आहे, तर २१ ते २७ डिसेंबरपर्यंत मुंबईतील कोविड वाढीचा दर ०.९ टक्के झाला आहे. सोमवारी हा दर ०.७ टक्के इतका होता.