नागपूर : आरोग्य खात्यातील बदल्यांसाठी पारदर्शक पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. आपण आरोग्य मंत्री पदाचा कारभार स्विकारल्यानंतर फेसलेस या पारदर्शक पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. यामुळेच आता राज्यातील आरोग्य खात्यातील सर्व बदल्या या फक्त योग्य निकषावर होत आहेत. शिवाय या पारदर्शक प्रणालीमुळे बदल्यांचे अधिकार माझ्याकडे नाहीतच. खा. संजय राऊत यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून त्यांच्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार, असा इशारा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिला.
सावंत म्हणाले, आरोग्य विभागामध्ये संचालकांची पदे भरली नाहीत. २०१२ पासून आतापर्यंत आरोग्य विभागाची बिंदुनामावलीच तयार नाही. संजय राऊत हे ते तीन ते चार टर्म खासदार आहेत. त्यांनी बिंदुनामावलीचे महत्व ओळखले पाहिजे. समाजकल्याण विभागाने त्याबाबत मागणी केली होती. त्याशिवाय सध्याची भरती झाली नसती. परंतु मी विनंती केली आणि तीन महिन्यांच्या अटींवर भरती प्रक्रिया सुरु केली. वास्तविक ११ मे २०२३ रोजी बदल्यांचे सर्व अधिकार आयुक्तांना देण्यात आलेले आहेत. शासन निर्णय १७ मे २०२३ नुसार ऑनलाईन बदल्या किंवा विनंती बदल्यांचे अधिकार मी प्रशासनाला दिलेले आहेत. भरती प्रक्रिया किंवा बदली प्रक्रिया पारदर्शकपणे सुरु आहेत. सीएसआर फंडातून ॲपची निर्मिती झाली आणि बदली पारदर्शकपणे होऊन गट अ ते गट क यांच्या ७ ते ८ हजार बदल्या झाल्याचे त्यांनी सांगितले.
कुठलातरी एक दगड घ्यायचा, तो मारायचा आणि नंतर बघत बसायचे, असे काहींचे काम आहे. माझ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर केलेल्या आरोपांमुळे माझ्या कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्ची झाले आहे. त्यामुळे खासदार संजय राऊत यांनी आरोग्य खात्यातील माझ्या सहकारी कर्मचाऱ्यांची माफी मागावी - तानाजी सावंत, आरोग्यमंत्री