अकोला, दि. २७- मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी गर्भलिंग निदान करणार्या रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी गठित जिल्हास्तरीय विशेष पथकाने सोमवारी सापळा रचून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत सुनील हिम्मतराव निचळ या आरोग्य सेवकास (एमपीडब्ल्यू) गर्भपाताच्या गोळय़ा अवैधरीत्या विकताना रंगेहात पकडले. सदर कर्मचारी हा ५ हजार रुपयांत गर्भपाताच्या गोळय़ा विकत असल्याचा गोरखधंदा अनेक दिवसांपासून करीत असल्याच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.जिल्हा प्रशिक्षण केंद्रात आरोग्य सेवक या पदावर कार्यरत असलेला सुनील हिम्मतराव निचळ रा. भारती प्लॉट, जुने शहर हा गत अनेक दिवसांपासून गर्भपात करण्यासाठी वापरल्या जाणार्या आरोग्य केंद्रामधील ह्यमिसोक्रास्टह्ण या गोळय़ा अवैधरीत्या विकत असल्याची निनावी तक्रार जिल्हास्तरीय समितीला ऑनलाइन आणि लेखी अशा दोन्ही स्वरूपात प्राप्त झाली होती. वैद्यकीय ज्ञान असल्यामुळे औषधांच्या दुकानांमधून कमी पैशांमध्ये मिसोक्रास्टच्या गोळय़ा घेऊन सुनील निचळ हा ५ हजार रुपये घेऊन विकत होता. या गोळय़ांच्या सेवनाने १२ आठवड्यापर्यंतचा गर्भपात होऊ शकतो, यामुळे अनेक जण सदर इसमाकडून या गोळय़ा घेत असल्याचे तक्रारीत नमूद होते. या तक्रारीवरून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाने सोमवारी सापळा रचला. डमी ग्राहक म्हणून सदर इसमास मोबाइलवरून गर्भपाताच्या गोळय़ा हव्या असल्याची मागणी केली. बोलणी झाल्यानंतर भेटण्याचे ठिकाण ठरले. ठरल्यानुसार विशेष पथकातील सदस्य चौधरी विद्यालयाजवळ पोहचले. तेथे सुनील निचळ गोळय़ा घेऊन आला. डमी ग्राहक म्हणून गेलेल्या पथकातील सदस्यास गोळय़ा देत असतानाच सुनील निचळ याला दबा धरून बसलेल्या पथकातील सदस्य व पोलिसांनी रंगेहात पकडले. यानंतर सुनील निचळ यास रामदासपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, तेथे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. विशेष पथकात मनपा आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख, अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी प्रशांत अस्वार, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील कर्मचारी व रामदासपेठ पोलिसांचा समावेश होता.आरोग्य विभागातील एमपीडब्ल्यू कर्मचारी अवैधरीत्या गर्भपाताच्या गोळय़ा विकत असल्याची ऑनलाइन तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार आज सापळा रचून सदर इसमास रंगेहात पकडण्यात आले असून, सदर प्रकरण पोलिसांत देण्यात आले आहे. - डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला
आरोग्य सेवकच विकत होता गर्भपाताच्या गोळय़ा!
By admin | Published: March 28, 2017 1:50 AM