मुंबई : राज्य परिवहन मंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिवाळीनिमित्त एक खूशखबर आहे, ती म्हणजे आता राज्यातील बस स्थानकांवर स्वस्तात औषधे उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी एसटी महामंडळाने जेनेरिक (ब्रँड किंवा पेटेंटशिवाय बनविलेली किंवा वितरित केलेली) औषधे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही औषधे एसटीच्या राज्यातील सर्व स्थानकांवर मिळतील. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वीच महामंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. याचा फायदा प्रवाशांना तसेच स्थानिकांना होणार आहे.सर्वसामान्य जनतेला स्वस्तात औषधे उपलब्ध व्हावीत या दृष्टीने जेनेरिक औषधे देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. कोणत्याही मोठ्या ब्रँड किंवा पेटेंटशिवाय ही औषधे उपलब्ध केली जातात. तसेच ही जेनेरिक औषधे ब्रँडेड औषधांप्रमाणे दर्जेदार असतात. स्वस्तात मिळणाऱ्या या औषधांचा सर्वसामान्य जनतेला फायदा होतो. सध्या महाराष्ट्रात ही औषधे उपलब्ध करण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. एकूणच महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला आणि प्रवाशांना जेनेरिक औषधे मिळावीत या दृष्टीने एसटी महामंडळाने राज्यातील सर्व बस स्थानकांवर ती उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील ५६८ बस स्थानकांवर अशा प्रकारची औषधे उपलब्ध केली जाणार असून, त्यासंदर्भात लवकरच सर्व प्रक्रिया सार्वजनिक आरोग्य विभागाशी बोलणी करून पार पाडली जातील. ही सेवा प्रवाशांना व स्थानिकांना देण्यासाठी २४ तास उपलब्ध असेल. यासंदर्भात परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सांगितले की, गोरगरिबांना स्वस्तातील औषधे मिळावीत म्हणून एसटी स्थानकांवर जेनेरिक औषधे देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. देशभरात तर फक्त ३०० ठिकाणीच अशा प्रकारची औषधे दिली जातात. एखाद्या नामांकित ब्रँडचे मिळणारे औषध १०० रुपयांचे असेल तर तेच औषध २५ रुपयांत मिळेल हा त्यामागील उद्देश आहे. लवकरच याबाबत प्रक्रिया पार पाडल्या जातील. (प्रतिनिधी)>४० ते ६० टक्के कमी दराने औषधे ही औषधे साधारपणे ४0 ते ६0 टक्के कमी दराने मिळतील.यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाशीही करार केला जाणार आहे. ही औषधे एसटी प्रवाशांबरोबरच परिसरातील स्थानिकांनाही उपलब्ध व्हावीत यासाठी महामंडळ प्रयत्नशील आहे.
एसटी स्थानकांवर स्वस्तात औषधे
By admin | Published: November 02, 2016 5:27 AM