ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. २२ - डोंबिवली-अंबरनाथ व डोंबिवलीतील रासायनिका सांडपाणी प्रक्रिया प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने १४२ कारखाने बंद करण्याची नोटिस दिली होती. या नोटिसला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका राष्ट्रीय हरीत लवादाकडे कारखानदार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी आत्ता 31 ऑगस्ट रोजी होणार आहे. 2 जुलै रोजी बजावलेल्या नोटिसला स्थगिती मिळावी यासाठी कारखानदारांनी लवादाकडे 11 जुलै रोजी धाव घेतली. या याचिकेवर सुनावणी होणार होती. त्या दिवशी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वकीलांकडून काही अवधी मागण्यात आला.
त्यामुळे लवादाकडून याचिकेवर सुनावणीच झाली नाही. 19 ऑगस्ट रोजी त्यावर सुनावणी होणार होती. 19 ऑगस्ट रोजी प्रदूषण मंडळाचे वकिल अनुपस्थित राहिल्याने या प्रकरणाची सुनावणी आज 22 ऑगस्ट रोजी होणार होती. कारखानदारांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजालेल्या नोटिसांच्या प्रति लवादास सादर केल्या गेल्या. या प्रति अस्पष्ट असल्याने त्यांच्या चांगल्या प्रति कारखानदारांनी त्यांच्या याचिका कागदसोबत जोडाव्यात असे लवादाकडून सूचित करण्यात आले. त्यामुळे या प्रकरणावर आजही देखील सुनावणी झाली नाही.
येत्या 31 ऑगस्ट रोजी या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.
कारखानदारांच्या याचिकेवर 31 ऑगस्ट रोजी सुनावणी आहे. त्याच दिवशी ‘वनशक्ती’ या पर्यावरण संस्थेच्या याचिकेवर 2013 पासून सुनावणी न्यायप्रविष्ट आहे. मागील तारखेच्या सुनावणीत पर्यावरण खात्याच्या सचिव संचालकांनी त्यांच्या वतीने सत्यप्रतिज्ञा पत्र सादर केले होते. त्यावर आत्ता वनशक्तीला बाजू मांडण्यास लवादाने सांगितले आहे. येत्या 31 ऑगस्ट रोजी वनशक्ती त्यांची बाजू लवादासमोर मांडणार असल्याचे याचिकाकर्ते अश्वीन अघोर यांनी सांगितले.