मुंबई : नुकत्याच जाहीर केलेल्या मुंबई महापालिकेच्या प्रस्तावीत प्रभाग पुनर्रचनेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्याशिवाय प्रभागांची संख्याही वाढवावी, अशी मागणीही याचिकेद्वारे करण्यात आली आहे. या याचिकेवर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.प्रभाग पुनर्रचना अधिसूचनेच्या वैधतेला शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख संजय भरणकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने १९९२ मध्ये मुंबई महापालिकेच्या प्रभागांची संख्या २२१ वरून २२७ केली. डिसेंबर २०१६ पर्यंत महापालिकेच्या दफ्तरी लोकसंख्येची नोंद एक कोटी २७ लाख ५४ हजार ३८० इतकी असूनही २०१७ च्या निवडणुकीसाठी प्रभाग संख्या वाढवली नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने वाढलेल्या लोकसंख्येला प्रतिनिधित्व नाकारले आहे, असे भरणकर यांनी याचिकेत म्हटले आहे. (प्रतिनिधी)
महापालिकेच्या प्रभाग रचनेवरील सुनावणी उद्या
By admin | Published: October 23, 2016 12:14 AM