मुंबई : पनवेल महापालिकेमध्ये समाविष्ट करून घेण्यास खारघर ग्रामपंचायतीचा नकार असल्याने उच्च न्यायालयाने ग्रामपंचायतीला याचिकेमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश देत या याचिकांवरील सुनावणी शुक्रवारी ठेवली आहे. १ आॅक्टोबरपासून पनवेल नगर परिषदेचे महापालिकेत रूपांतर करण्यात येणार आहे. दोनच दिवसांपूर्वी राज्य सरकारने तसे जाहीर करत अधिसूचना काढली आहे. पनवेल महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमध्ये खारघरचाही समावेश आहे. मात्र खारघर ग्रामपंचायतीचा व काही स्थानिकांचा यास विरोध आहे. पनवेल महापालिकेमध्ये खारघरचा समावेश करू नये. नवी मुंबई महापालिकेमध्येच राहून आम्ही आमचा विकास करू, असे खारघरच्या ग्रामपंचायतीने याचिकेत म्हटले आहे. मात्र ही याचिका सरकारने अधिसूचना काढण्यापूर्वी दाखल करण्यात आल्याने उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सरकारच्या नव्या निर्णयानुसार याचिकेत सुधारणा करा, असे निर्देश देत सर्व याचिकांवरील सुनावणी शुक्रवारी ठेवली आहे. आणखी काही नगर परिषदांचा महापालिकेत रूपांतर करण्याचा सरकारचा विचार आहे. मात्र याबद्दल सरकार वेळीच निर्णय घेत नसल्याने राज्य निवडणूक आयोगाला फटका बसत आहे. निवडणुका तोंडावर आल्यावर सरकार असे निर्णय घेत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने हाती घेतलेला निवडणूक कार्यक्रम पुन्हा नव्याने हाती घ्यावा लागत आहे. त्यात श्रम आणि पैसा दोन्ही वाया जात आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचे काम वाढत आहे, अशी तक्रार निवडणूक आयोगाच्या वतीने अॅड. सचिंद्र शेट्ये यांनी उच्च न्यायालयात केली. उच्च न्यायालयाने त्यांना हे सर्व प्रतिज्ञापत्रात मांडण्याचे निर्देश देत या याचिकांवरील सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब केली. (प्रतिनिधी)
पनवेल पालिकाविरोधी याचिकेवर सुनावणी आज
By admin | Published: September 30, 2016 2:40 AM