ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. ४ : घरकूल प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात जामीन मिळावा, म्हणून माजी आमदार सुरेशदादा जैन यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर ७ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. या दिवशी सरकार पक्षाकडून घरकूल प्रकरणाच्या सद्यस्थितीच्या माहितीचा अहवाल न्यायालयात सादर केला जाणार आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सुरेशदादा जैन यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर ४ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती अरूणकुमार मिश्रा व न्यायमूर्ती खेड यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. त्यात सर्वोच्च न्यायालयाने, जिल्हा व सत्र न्यायालयात घरकूल प्रकरणाची स्थिती काय आहे? याचा अहवाल (केस स्टेटस डिटेल्स) सादर करण्याचे आदेश सरकार पक्षाला दिले. या संदर्भात पुढील सुनावणी ७ जुलै रोजी होणार असून या दिवशी सरकार पक्षाकडून केस स्टेटस डिटेल्स सर्वोच्च न्यायालयात सादर केले जाणार आहेत. सुरेशदादा जैन यांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ अॅड.कपिल सिब्बल कामकाज पाहत आहेत.