मुंबई - बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक होऊ नये, यासाठी शिवसेना (उबाठा गट) आमदार राजन साळवी यांच्या पत्नी व मुलाने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने सोमवारी साळवी यांच्या कुुटुंबीयांना तातडीने दिलासा देण्यास नकार देत याचिकेवर उद्या, मंगळवारी सुनावणी ठेवली.
राजन साळवी यांच्या पत्नी व मुलगा यांच्या वतीने ॲड. सुदीप पासबोला यांनी न्या. सारंग कोतवाल यांच्या एकलपीठापुढे बाजू मांडली. एसीबीकडे काही कागदपत्रे सादर केली असून, त्या कागदपत्रांच्या आधारे युक्तिवाद करायचा असल्याचे पासबोला यांनी न्यायालयाला सांगितले. त्यामुळे न्यायालयाने पासबोला यांना संबंधित कागदपत्रे याचिकेला जोडण्याचे निर्देश देत याचिकेवर मंगळवारी सुनावणी ठेवली.
‘अटकेची सूचना नाही’
कोतवाल यांनी एसीबीकडे विचारणा केली की, साळवी यांच्या पत्नी व मुलाला अटक करणार का? त्यावर सरकारी वकिलांनी आपणाला याचिकादारांना अटक करण्याच्या किंवा न करण्याच्या कोणत्याही सूचना नसल्याचे न्यायालयाला सांगितले. एसीबीच्या म्हणण्यानुसार, साळवी आणि त्यांच्या कुटुंबाकडे त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्त्रोतांपेक्षा ३.५ कोटी रुपयांची जास्त संपत्ती आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय सूडबुद्धीने हा क्षुल्लक गुन्हा आपल्यावर दाखल करण्यात आला आहे, असे साळवी यांच्या पत्नीने व मुलाने याचिकेत म्हटले आहे.