कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तहकूब केलेली सुनावणी आज, मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या समोर होत आहे. दरम्यान, सोमवारी उच्च न्यायालयात पानसरे व दाभोलकर यांच्या खटल्यांची सुनावणी न्यायमूर्ती रजेवर असल्याने झाली नाही. सीबीआय, एसआयटी व सीआयडी (कर्नाटक) या तपास यंत्रणांत समन्वय झाल्याने नवे पुरावे पुढे येण्याची शक्यता आहे. सोमवारी (२८ मार्च) पानसरे व दाभोलकर यांच्या खटल्यांची मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत सुनावणी तहकूब ठेवावी, असा विनंती अर्ज सरकार पक्षाने जिल्हा सत्र न्यायालयास सादर केला होता. त्यावर आरोपी समीर गायकवाड याच्याविरोधात दोषारोप निश्चित करण्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश बिले यांनी आज, मंगळवारपर्यंत तहकूब ठेवली. तसेच तपास यंत्रणेला वीस दिवसांचा वेळ देत पुरवणी अहवाल सादर करण्याच्या सूचना न्यायाधीश बिले यांनी दिल्या होत्या. तपास अधिकारी डॉ. दिनेश बारी हे सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहिले होते, परंतु सुनावणी न झाल्याने ते माघारी परतले. उच्च न्यायालयात सुनावणी न झाल्याने आज न्यायाधीश बिले समीर गायकवाडच्या विरोधात दोषारोप निश्चितीबाबतचा काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी) पानसरे-दाभोलकर खटल्यांच्या सुनावणीस मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी हजर होतो, परंतु न्यायाधीश रजेवर असल्याने सुनावणी झाली नाही. उच्च न्यायालयात पुरवणी तपास अहवाल सादर केलेला नाही. त्यामुळे आज, मंगळवारी होणाऱ्या सत्र न्यायालयाच्या सुनावणीमध्येही तपास अहवाल सादर केला जाणार नाही. - डॉ. दिनेश बारी, अप्पर पोलिस अधीक्षक, तपास अधिकारी
पानसरे खटल्याची आज सुनावणी
By admin | Published: March 29, 2016 1:14 AM