पुणे/मुंबई : राज्यात आलेली उष्णतेची लाट कायम असून शुक्रवारी तब्बल २२ जिल्ह्यांतील पारा चाळीशीच्या पुढे होता. विदर्भ, मराठवाडा अजूनी रखरखत असून बीड जिल्ह्यात उष्माघाताचा एक बळी गेला. सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे ४४.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माणदेशात अवकाळी पावसाने हजेरी लावली.मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यातील वाढलेले तापमान कायम आहे. किमान तापमानातही वाढ झाल्याने रात्रीही प्रचंड उकाडा जाणवत आहे. दुपारी रखरखीत उन्हामुळे जीव कासावीस होत आहे. बीड जिल्ह्यातील धनगरजवळका (ता. पाटोडा) येथील नवनाथ आत्माराम आर्सूळ (वय ५२, रा. बेनूसर, ता. पाटोदा) या शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला. नवनाथ हे कामानिमित्त चुंबळीफाटा येथे गेले होते. जवळच्या शेतात ते भोवळ येऊन कोसळले. त्यानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाला. उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. उपराजधानी नागपूरात ४३.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गुरुवारच्या तुलनेत यात निश्चितच ०.२ अंशाने घसरण झाली आहे, मात्र त्यामुळे नागपूरकरांना फारसा दिलासा मिळालेला नाही. संपूर्ण विदर्भच भाजून निघत आहे. चंद्रपूरपाठोपाठ वर्धा येथे ४३.८, अकोला ४३.६, अमरावती ४२, बुलडाणा ४०.२, ब्रह्मपुरी ४३.३, गोंदिया ४२, वाशिम ३८.८ आणि यवतमाळ येथे ४२.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)दुष्काळी माणदेशात अवकाळी पाऊससातारा जिल्ह्यातील दुष्काळी माणदेशात खटावमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुपारी तीनपासूनच काळ्या ढगांनी आभाळ भरून येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे हवेत अधिकच उष्मा जाणवत होता. सायंकाळी साडेचारच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटामध्ये पावसाला सुरुवात झाली. सुमारे पाऊण तास पडलेल्या पावसामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. खटाव तालुक्यातील वर्धनगडपासून पुसेगाव,बुध परिसरात काही प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्या.
उष्णतेची लाट कायम
By admin | Published: April 01, 2017 3:53 AM