मुंबई : गेल्या आठ दिवसांपासून उष्णतेच्या लाटेत महाराष्ट्र होरपळून निघत असून, शुक्रवारी राज्यातील अनेक शहरांचे तापमान ४० अंशाच्या पुढे गेल्याने काहिली वाढली आहे. वर्ध्यात सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आणखी दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असून नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.सौराष्ट्र, कच्छ भागात उष्णतेची लाट कायम असून, तेथे कमाल तापमान सरासरीपेक्षा ५ अंशाने वाढले आहे़ गुजरात, पश्चिम राजस्थान येथून येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे महाराष्ट्र तापला आहे. पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम राहील, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. संपूर्ण राज्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यातील तब्बल २२ शहरांचे कमाल तापमान ४० अंशावर नोंदवण्यात आले आहे. मुंबईचे कमाल तापमानही ३५ अंशावर स्थिर असून, वाढता उकाडा मुंबईकरांचा घाम काढत आहे. मुंबईत उष्ण आणि कोरडे वारे वाहत असून, आर्द्रतेमध्येही वाढ होत आहे. (प्रतिनिधी)रात्रीचे पुणे सर्वांत थंड : महाबळेश्वरचे आजचे तापमान ३५.१ अंश सेल्सिअस होते. सरासरीपेक्षा तापमानात ३ अंशाने वाढ झाली आहे. महाबळेश्वरचे किमान तापमानही २१.६ इतके आहे. त्याच्यापेक्षा पुण्याचे किमान तापमान कमी असून ते १८.८ अंश सेल्सिअस आहे. पुण्यात सध्या रात्री राज्यातील सर्वांत कमी तापमान आहे. प्रमुख शहरांमधील कमाल तापमान : औरंगाबाद ४१.१, नाशिक ४०.९, परभणी ४३.१, पुणे ४०.१, सांगली ४०.४, सातारा ४०.१, सोलापूर ४२.२, अकोला ४४.१, अमरावती ४१.६, बुलडाणा ४०.६, चंद्रपूर ४२.६, गोंदिया ४२.६, नागपूर ४२.८, वाशिम ४०.८, वर्धा ४३.५, यवतमाळ ४२.५, अहमदनगर ४३.२, जळगाव ४३.२, मालेगाव ४३.२, नांदेड ४३, उस्मानाबाद ४१.३, बीड ४१.६
महाराष्ट्रात पुन्हा आली उष्णतेची लाट
By admin | Published: April 15, 2017 4:16 AM