ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ : मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले असतानाच सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केल्याने राज्यातील जनजीवन होरपळून निघाले आहे. खान्देश, विदर्भ आणि मराठवाडा अक्षरक्ष: भाजून निघाला असून, असह्य उकाड्यामुळे जिवाची काहिली झाली आहे. आज अकोल्यामध्ये हंगामातील सर्वाधिक ४७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. २०११ नंतरची ही सर्वाधिक तापमानाची नोंद आहे. प्रचंड उष्णतेच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने दिल्ली, पंजाब, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रातील विदर्भात अॅलर्ट जारी केला आहे.
राज्यातील तापमानात गेल्या पाच-सहा दिवसांपासून वाढ होत आहे. आतातर उष्णतेची लाट आणखी तीव्र झाली आहे. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये ४४.१अंश तापमानाची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे दिल्लीचे तापमानही वाढले आहे. दिल्लीत आज ४४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर गेल्या रविवारी नागपुरातील तापमान ४५.७ अंशावर पोहोचले होते.
राज्यातील प्रमुख शहरांचे तापमान -
अकोला ४७.१, वर्धा ४६, नागपूर ४४.१, जळगाव ४५.२, परभणी ४४.६, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर ४४.४, नांदेड ४३.५, वाशिम ४३, बुलडाणा, सोलापूर ४३.५, सांगली ४२.३, औरंगाबाद ४१.२, पुणे ४२.४, गोंदिया ४१.९, सातारा ४१.३, कोल्हापूर ४१.१, नाशिक ४०.४, डहाणू ३५.५, रत्नागिरी ३४.५, महाबळेश्वर ३४, मुंबई ३२.
इंदापूरचा पारा ४१ अंश सेल्सिअसवर
इंदापूर : इंदापूरचा पारा ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. दुपारी बारा ते तीन या वेळात घरातून बाहेर पडण्यास कोणी ही धजावत नाही. त्यामुळे शहरातील गल्ली-बोळांत अघोषित संचारबंदी सुरू असल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे.
सकाळी आठ वाजल्यापासूनच ऊन पडायला सुरुवात होते. बारा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत भाजून काढणारे ऊन लागते. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत घरातच काय अंगणात बसले तरी चांगलीच धग लागते. अंगाला घामाच्या धारा लागतात. असह्य उकाड्यामुळे झोप लागत नाही, अशी इंदापूरकरांची अवस्था झाली आहे. सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत भाजी मंडई असते. त्या वेळात तेथे गर्दी असते. त्यानंतर साधारणत: चार वाजेपर्यंत गल्ली-बोळासह शहराच्या मुख्य रस्त्यावर शुकशुकाट असतो. आठवडा बाजारात सकाळी व संध्याकाळी उशिरापर्यंत लोकांची वर्दळ असते.
यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे माठ, कुलर खरेदी करण्याकडे कल वाढल्याचे दिसते आहे. वीजभारनियमन सुरू होण्याची शक्यता आहे. इनव्हर्टर खरेदीलाही वेग येईल, असे दिसते आहे.
गेल्या आठ-दहा दिवसांपासून कलिंगडाची आवक कमी झाली आहे. गावरान खरबुजे विक्रीला आली आहेत. आंबे दिसत आहेत. मागणी ही चांगली आहे.
बारामती ४२, भवानीनगरमध्ये ४३अंश सेल्सिअस तापमान
उपाययोजनेबाबत आवाहन : मंगळवार ते शनिवारदरम्यान राज्यात उष्णतेची मोठी लाट येणार
बारामती : वळवाच्या पावसानंतरदेखील बारामती शहरात वाढते तापमान कायम आहे. मंगळवारी (दि. १७) शहरात ४२ अंश सेल्सिअस उच्चांकी तापमानाची नोंद झाल्याचे माळेगाव येथील कृषिविज्ञान केंद्राच्या सूत्रांनी सांगितले, तर इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर १७ ते २१ मेदरम्यान राज्यात उष्णतेची मोठी लाट येण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने याबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. नागरिकांनी पुरेशी काळजी घेण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. त्यामध्ये नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे, हलके, पातळ, सुती कपडे घालावेत, घरातून बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट, चपलांचा वापर करावा. घरी बनविण्यात आलेली लस्सी, लिंबूपाणी, ताक या पेय पदार्थांचे आवश्यकतेप्रमाणे सेवन करावे. पाळीव प्राण्यांना, गुरांना छावणीत ठेवावे. त्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी द्यावे. गर्भवती महिला, आजारी व्यक्तींनी अधिक काळजी घ्यावी. मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघराची दारे व खिडक्या उघड्या ठेवाव्यात, पहाटेच्या वेळी अधिक कामाचा निपटारा करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच, काय करू नये, याबाबत स्वतंत्र सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शिळे अन्न खाऊ नये, उच्च प्रथिने असलेले अन्न टाळावे, चहा, कॉफी, मद्य, काबोर्नेटेड थंड पेय यांचे सेवन टाळावे, दुपारी १२ ते ३ या कालावधीत बाहेर काम करण्याचे टाळावे. गडद, घट्ट आणि जाड कपडे घालण्याचे टाळावे.