मुंबई : ऊन, वारा आणि पाऊस; अशा सातत्याने हवामानात होत असलेल्या बदलामुळे महाराष्ट्र बेजार असतानाच, यात भर म्हणून आता हवामान खात्याने पुन्हा एकदा विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. २३ ते २५ एप्रिल दरम्यान विदर्भात उष्णतेची लाट येणार आहे. मुंबईचा विचार करता मुंबईचे कमाल तापमान ३३ अंशावर स्थिर असले, तरी प्रत्यक्षात मात्र उन्हाचा तडाखा आणि वाढता उकाडा मुंबईकरांचा आणखी घाम काढणार आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे होते. कोकण, गोव्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. मुंबईचा विचार करता, गेल्या आठवडाभरापासून मुंबईचे कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविण्यात येत आहे, तर आर्द्रता ८० टक्क्यांच्या आसपास आहे. शिवाय वाढते ऊन तापदायक ठरत असून, उकाड्यातही दिवसागणिक वाढ होत आहे.आकाश राहणार निरभ्रसोमवारससह मंगळवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३, २४ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे.हवामानाबाबत ‘स्कायमेट’ संस्थेचा अंदाजहॉट सिटी : महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओरिसा आणि तामिळनाडूमधील अनेक शहरांचे रविवारचे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविण्यात आले आहे. महाराष्ट्रात परभणीचे कमाल तापमान ४२.१ अंश नोंदविण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील खरगौन येथे ४२, कर्नाटकातील रायचूर येथे ४१, हैद्राबादमधील तिरुपती येथे ४१ अंश कमाल तापमान नोंदविण्यात आले.हलक्या सरींची नोंदतामिळनाडू आणि केरळमध्ये काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड, ओरिसा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातही हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे.
विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा; मुंबईही तापणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 6:05 AM