ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 - गिरगावमधील ड्रीमलँड थिएटरसमोरच असणाऱ्या तीन मजली मेहता मेन्शन इमारतीला रात्री सव्वा आठच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीची तीव्रता एवढी होती की त्याला लागूनच असणाऱ्या रहिवासी इमारतीतील रहिवाशांनी इमारती खाली केल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.लॅमिग्टन रोडवरील ड्रीमलँड थिएटरसमोरच तीन मजली मेहता मेन्शन इमारत आहे. या इमारतीत बहुतांश कार्यालये आहेत. तर इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर दोन कुटुंबं राहतात. रविवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास या इमारतीच्या पहिल्या मजल्याला आग लागली. आग लागताच परिसरातील रहिवाशांनी त्वरित अग्निशमन दलाला त्याची माहिती दिली. घटनेची माहिती प्राप्त होताच सुरुवातीला आठ फायर इंजिन आणि सहा टँकर घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाकडून प्रथम तिसऱ्या मजल्यावरील दोन्ही कुटुंबांना बाहेर काढण्यात आले. आग विझविण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून केले जात असतानाच ही आग भडकतच होती. त्यामुळे आणखी चार फायर इंजिन व दोन वॉटर टँकरही दाखल झाले. आगीची तीव्रता एवढी होती की आगीच्या झळा बाजूच्या परिसरातील अन्य इमारतींनाही बसत होत्या. त्यामुळे परिसरातील रहिवासी इमारती खाली करण्यात आल्या. अरुंद गल्ल्या आणि आणि आगीमुळे प्रचंड धूर यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत होते. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. आगीचे नेमके कारण मात्र समजू शकले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले जाते. बहुुतांश कार्यालये असल्याने मोठ्या प्रमाणात फर्निचर जळून खाक झाले.