Heavy Rain Alert In Maharashtra: भारतीय हवामान खात्याने मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, अमरावती आणि ठाण्यात उद्या पावसाच्या संदर्भात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर पालघर, नाशिक आणि पुणे येथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबतच महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील शाळा आणि महाविद्यालये 16 जुलैपर्यंत बंद राहणार आहेत.
अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील अत्यावश्यक कामे करणारी शासकीय कार्यालये वगळता सर्व शाळा, महाविद्यालये आणि इतर आस्थापने 16 जुलैपर्यंत बंद राहतील. रेड अलर्ट (अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा) पाहता प्रशासनाने 10 ते 13 जुलैपर्यंत शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी बुधवारी या आदेशाला 16 जुलैपर्यंत वाढ दिली.
अतिवृष्टीच्या अंदाजामुळे पुणे शहरातील तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील सर्व शाळा गुरुवारी बंद राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. नाशिक जिल्ह्यात संततधार पावसामुळे अनेक नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.