लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्यात सर्वदूर सक्रिय झालेल्या मान्सूनचा सध्या मध्य महाराष्ट्रात जास्त जोर आहे. गुरुवारी कोयना, राधानगरी, चंदगड, गगनबावडा, महाबळेश्वर येथील धरणांच्या लाभक्षेत्रात अतिवृष्टी झाली. विदर्भातील रिसोड, गोंदिया तसेच कोकणात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. येत्या २४ तासांत उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे़ मध्य महाराष्ट्रातील धरणांच्या लाभक्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी ,काळमावाडी आणि तुळशी धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत असून भोगावती, दूधगंगा,आणि तुळशी नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पुराच्या पाण्यामुळे गगनबावडा कोल्हापूर मार्ग बुधवारी सायंकाळपासून बंद आहे. सातारा जिल्ह्यातही दमदार पाऊस आहे. महाबळेश्वर, कोयना, नवजा येथे पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील साठी चोवीस तासांत पाच टीएमसीने वाढला. सध्या धरणात ६२ टीएमसी साठा आहे. कऱ्हाड तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरांची पडझड झाली. सांगलीत जिल्ह्यात चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठा ६७ टक्क्यांच्या घरात गेला आहे. जत, आटपाडी हे दुष्काळी तालुके वगळता जिल्ह्यात सर्वदूर मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. मराठवाड्यात हिंगोली, बीड, नांदेड, परभणी जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. भीमा खोऱ्यातील ६ धरणातून विसर्गभीमा खोऱ्यात सध्या जोरदार पाऊस पडत असल्याने २५ पैकी १३ धरणात ५० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. वडज, कळमोडी, वडिवळे, आंध्रा आणि कासारसाई धरणातून पाणी सोडण्यात येत आहे.
मध्य महाराष्ट्रातील धरण क्षेत्रात अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 2:08 AM