पुणे : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून दक्षिण महाराष्ट्र ते कर्नाटक किनारपट्टीवर हे कमी दाबाचे क्षेत्र पसरले आहे़. ते केरळपर्यंत विस्तारणार आहे़. त्याचबरोबर बंगालच्या खाडीमध्ये उंचस्तरावर द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे़. त्यामुळे ओडिशा किनारपट्टीपासून ते पश्चिमेकडे येण्याची शक्यता आहे़. त्यामुळे येत्या १९ जुलैच्या सायंकाळपासून राज्यात विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण वाढलेले दिसून येईल़. हा पाऊस २२, २३ जुलैपर्यंत राहणार असून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़. कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होईल़. २४ जुलैला पावसाचे प्रमाण थोडे कमी होईल, अशी माहिती डॉ़. अनुपम कश्यपि यांनी दिली आहे.
कश्यपि यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यानंतर लगेचच आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून त्यामुळे जुलैअखेरपर्यंत महाराष्ट्रात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे़. सध्या विदर्भ व मराठवाड्यासह ३१ जिल्ह्यांमध्ये पावसाने ओढ दिल्याने कठीण स्थिती निर्माण झाली आहे़. या पावसामुळे जुलै महिन्यातील पावसाची सरासरी भरुन काढण्याची शक्यता आहे.
पश्चिम किनारपट्टीवर दक्षिण भारतात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने केरळसह कर्नाटक, तामिळनाडु, आंध्र प्रदेश किनारपट्टी तेलगंणा, कोकण, गोव्यासह संपूर्ण मराठवाड्यात पुढील चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे़. १९ व २० जुलैला संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार तर २१ व २२ जुलैला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़.
पश्चिम किनाऱ्यावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने केरळ, कर्नाटकाच्या किनारपट्टी भागात पुढील चार दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे़. या कमी दाबाच्या क्षेत्राचा फायदा महाराष्ट्रालाही मिळणार आहे़. कोकण, गोव्यात १९ ते २२ जुलै दरम्यान कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस होणार असून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़. मराठवाड्यात चारही दिवस बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकेल़. विदर्भात १९ व २० जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार असून तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. हवामान विभागाच्या वतीने पुढील २ आठवड्यांचा अंदाज गुरुवारी जाहीर करण्यात आला़ १९ ते २४ जुलै दरम्यान मॉन्सून सक्रीय राहणार असून त्यामुळे लक्ष्यद्वीप, कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड आणि महाराष्ट्र, अंदमान, निकोबार, उत्तरपूर्व राज्ये, हिमालयीन रांगा व पश्चिम बंगाल, सिक्कीम येथे सर्वदूर पाऊस होण्याची शक्यता आहे़. या आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे़ तर, २५ ते ३१ जुलै दरम्यान देशातील अनेक भागात पावसाच्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता असून सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़. गेल्या २४ तासात कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला़. ...............रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९ ते २२ जुलै या चारही दिवसात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे़. पुणे कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद या जिल्ह्यात १९ ते २२ जुलै दरम्यान चारही दिवसा बहुतांश ठिकाण पाऊस होईल़. नाशिक जिल्ह्यात २० ते २२ जुलै, जालना व परभणी जिल्ह्यात १९ व २० जुलै तसेच हिंगोली जिल्ह्यात १९ जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे़.