अकोला: वर्हाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तिन्ही जिल्ह्यांमध्ये गुरुवारी संततधार पाऊस बरसला. वाशिम जिल्ह्यात पावसाचा जोर जास्त होता. या जिल्ह्यातील ढोरखेडा गावातील जवळपास ४0 घरांची पडझड झाली असून, बुलडाणा जिल्ह्यात एका महिलेचा वीज कोसळून मृत्यू झाला. अकोल्यातील बार्शिटाकळी तालुक्यातील एका गावात चक्रीवादळाने अक्षरश: तांडव केले. या गावातील सागवानाची अख्खी झाडं वादळीवार्यात उडताना लोकांनी पाहीली.
वाशिम जिल्ह्यात सर्वदूर दमदार हजेरी लावली. या पावसाने शेतकर्यांना दिलासा मिळाला असला तरी, मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा येथे वादळीवारा आणि मुसळधार पावसाने ३0 ते ४0 घरांची पडझड झाली असून १३ जण जखमी झाले. सुसाट्याच्या वार्याने घरांवरील टिनपत्रे उडून गेले. भिंतींची पडझड झाली. काही झाडे घरांवर उन्मळून पडल्याने घरांची पडझड झाली. गावातील जवळपास ३0 ते ४0 घरांची पडझड झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घराच्या पडझडीत १३ जण जखमी असून, एक महिला गंभीर जखमी झाल्याने तिला अकोला येथे हलविण्यात आले. पंधरा दिवसांपासून वातावरणात प्रचंड उकाडा होता. त्यामुळे खरीप पिकांवर ताण आल्याने, सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा होती. अकोल्यात गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ आणि पावसाचे वातावरण होते.
सकाळी ११ वाजतापासून अकोला जिल्हय़ातील सातही तालुक्यात पाऊस सुरू झाला. या पावसामुळे कपाशी, सोयाबीन, तूर, ज्वारी इत्यादी खरीप पिकांना संजीवनी मिळाली आहे. सायंकाळी ५.३0 वाजेपर्यंत अकोला शहरात २१.0४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. बाश्रीटाकळी तालुक्यातील मुंगसाजीनगर या आदिवासीबहुल परिसराला चक्रीवादळाचा फटका बसला. जंगलातील शेकडो सागवान झाडे मुळासकट उखडून हवेत उडताना गावकर्यांनी पाहिले. ही विनाशकारी दृश्ये अनेकांनी ह्ययाची डोळाह्ण पाहिली. निसर्गाचे हे तांडव सुरू असताना ग्रामस्थ ते पाहत जीव मुठीत धरून घरात बसले होते. अगदी गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सागवान जंगलात व शेतांमध्ये हे चक्रीवादळ घुसले आणि गावकरी या विनाशकारी संकटातून वाचले.
पावसाने बुलडाणा जिल्ह्यातही हजेरी लावली. जळगाव जामोद तालुक्यातील एका महिलेचा वीज कोसळून मृत्यू झाला. रसुलपूर येथील अंजनाबाई प्रकाश वानखडे (वय ५0) व तिचे पती प्रकाश वानखडे हे शेतामधून घरी जात असताना अंजनाबाईच्या अंगावर वीज कोसळली. त्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.