मुंबई : राज्यात उशिरा दाखल झालेल्या पावसाने जुलैमध्ये दाणादाण उडवली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कोसळधारांनी गुरुवारी थोडीशी उसंत घेतल्याने पूरस्थिती ओसरल्याचे चित्र होते. विदर्भात मात्र पावसाचा जोर कायम आहे. नागपूर, चंद्रपूर तसेच गडचिरोली जिल्ह्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले. पुरात भंडारा येथील एक आणि गडचिरोली येथील एक असे दोन जण वाहून गेले.
मराठवाड्यात पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने बहुतांश धरणे व प्रकल्पांमध्ये पाण्याची आवक वाढली. प. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत दिवसभर रिपरिप चालू होती. कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा जोर ओसरला आहे. अमरावती, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात संततधार सुरू आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात मुसळधार बरसल्याने प्रकल्पातील काही रस्ते वाहून गेले. सेमाडोह येथे १० जुलै रोजी तब्बल २६४ मिमी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. अकाेला जिल्ह्यातील पिंपळडोली येथील निर्गुणा नाल्याला आलेल्या पुरामुळे पूल वाहून गेला असून, आदिवासीबहुल ११ गावांचा संपर्क तुटला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे.
अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊसदेशभरात अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. गुजरात, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तसेच केरळ या राज्यांना पावसाचा तडाखा असला आहे. गुजरातमध्ये पूरस्थिती अतिशय गंभीर असून, २४ तासांमध्ये मुसळधार पावसाने १७ जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबाद-सूरत महामार्ग बंद असून, मुंबई व नागपूरला जाणारी वाहतूक ठप्प झाली.