लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यात हवामानातील उल्लेखनीय बदलामुळे येत्या चार दिवसांत राज्याच्या अंतर्गत भागात विजांच्या कडकडाटासह गडगडाट होण्याची शक्यता आहे. याशिवाय कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
ऑगस्ट - सप्टेंबर शेवटच्या दोन महिन्यांत देशासाठी सरासरी ४२ सेमी अपेक्षित असतो. महाराष्ट्रात पूर्व विदर्भ, दक्षिण कोकण व कोल्हापूर वगळता पाऊस हा दोन महिन्यांच्या सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यताही ३५-४५ टक्के असते. त्यामुळे दोन महिन्यांत सरासरी किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये देशासाठी सरासरी २५ सेमी पाऊस अपेक्षित असतो.
मात्र यावर्षी महाराष्ट्रात पाऊस हा ऑगस्टच्या सरासरी किंवा सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता ३५ ते ४५ टक्के जाणवते, अशी माहिती हवामान विभागाचे माजी अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली. दरम्यान,गेल्या २४ तासांत गोव्यासह राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जरी कमी दिसत असले तरी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत मिळून राज्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असेल.- कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, भारतीय हवामान शास्त्र विभाग.