Rain Update : गेल्या काही दिवसापासून राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. सांगल, कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती आहे. यामुळे नदीच्या बाजूला असणाऱ्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. राधानगरी धरणातील पाणी पातळीही वाढली आहे, त्यामुळे कोणत्याही क्षणी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडू शकतात. तर दुसरीकडे चांदोली धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पुण्यातही मुसळधार पाऊस सुरू असून भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर आणि पुणे शहरातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Breaking: पुण्यात रात्रभर पाऊस कोसळतोय; आज संपूर्ण शहर, या भागातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश
हवामान विभागानुसार, २५-२६ जुलै दरम्यान गुजरात राज्य, कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, ओडिशा, कर्नाटक, पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश आणि केरळ आणि माहे येथे मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या राज्यांच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर IMD ने काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाने सिंधुदुर्ग, कोल्हापूर (घाट भागात), रायगड, पुणे (घाट भागात) पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबईसह उपनगरातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार आणि विदर्भात ऑरेंज अलर्ट आहे. दरम्यान, महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली आहे.
सांगलीच्या पूरपट्ट्यातील नागरिकांचे स्थलांतर सुरु
आयर्विन पुलाजवळील पाणीपातळी ३० फुटांवर गेल्यानंतर सांगलीच्या सूर्यवंशी प्लाॅटमध्ये पुराचे पाणी दाखल झाले. याठिकाणच्या १० कुटुंबांचे बुधवारी स्थलांतर करण्यात आले. पाणीपातळीत वाढ झाली तर परिसरातील आणखी काही कुटुंबांचे स्थलांतर करावे लागणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.
सांगलीच्या सूर्यवंशी प्लॉटमध्ये मध्यरात्री पाणी दाखल झाले. येथील आठ घरांना पाण्याने वेढले. त्यामुळे महापालिकेच्या सुचनेनुसार काही कुटुंबांनी नातेवाईकांकडे तर काहींनी महापालिकेच्या पुनर्वसन केंद्रात स्थलांतर केले. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.
कोयना धरणातील पाणीसाठा ७० टीएमसीच्या उंबरठ्यावर
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने राैद्ररूप धारण केले असून साताऱ्यातही संततधार सुरू आहे. यामुळे पश्चिमेकडील घाटमार्गात दरडी कोसळू लागल्यात. नागरिकांनाही सुरक्षितस्थळी हलविण्यात येऊ लागलं आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर २४ तासांत सर्वाधिक पाऊस कोयना येथे १६२ तर नवजाला १५७ मिलीमीटर झाला आहे. कोयनेतील साठाही ७० टीएमसीच्या उंबरठ्यावर पोहोचलाय.