राज्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबई आणि पुण्यात पहाटेपासून तर विदर्भात आणि मराठवाड्यात देखील पावसाने दमदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने कोकण, गोवा आणि विदर्भात आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. दरम्यान, कालपासून अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे.
पुढील ४८ तासांत कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या सोबतच राज्यात ९ आणि १० तारखेला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भात देखील पुढील ४८ तासात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुण्यात आज वातावरण ढगाळ राहणार असून अधून मधून पावसाच्या तीव्र सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर घाट परिसरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर ९ आणि १० तारखेला पावसाचा जोर कमी होणार असून यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, मुंबईसह परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सखल भागात पाणा साचायला सुरुवात झाली आहे. ठाणे परिसरात देखील पावसाचा जोर वाढला आहे. तर दुसरीकडे पालघर जिल्ह्यातही सकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे
दरम्यान, राज्यावर आज हवामानाच्या तीन स्थिती सक्रिय आहेत. वाऱ्याची चक्रीय स्थिती ओडिशा आणि दक्षिण छत्तीसगडवर प्रभावी आहे. मॉन्सूनची द्रोनिका स्थिती दक्षिणेकडे असून इंदूर आणि बैतूलवरून जात आहे. तसेच कमी दाबाचा पट्टा हा १९ डिग्री उत्तरेकडे तयार झाला आहे. तसेच अरबी समुद्राकडून येणारे पश्चिमी वारे तीव्र आहेत. त्यामुळे राज्यात बऱ्याच जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, कोकण, गोवा, मुंबई आणि पुण्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पुढील ४८ तासात पाऊस तीव्र किंवा अतितीव्र पद्धतीने सक्रिय होणार आहे. तर राज्याच्या संपूर्ण विभागात विजांच्या कडकडाट आणि मेघवर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.