पुणे : राज्यात नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) दाखल होण्यास अवघे काही तास शिल्लक असताना पूर्वमोसमी पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या २४ तासांत कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी, तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. केरळमध्ये दाखल झाल्यापासून मॉन्सूनला आगेकूच करण्यासाठी अनुकूल स्थिती आहे. त्यामुळे तो दररोज पुढे सरकत आहे. शुक्रवारी तो आणखी पुढे सरकला. त्याने आज कर्नाटक, रायलसीमा, आंध्र प्रदेश या राज्यांचा आणखी काही भाग व्यापला. गेल्या २४ तासांत सावंतवाडी येथे सर्वाधिक ८० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.त्यापाठोपाठ कोकणातील रत्नागिरी, कणकवली, पेडणे, राजापूर,देवगड, मालवण, वेंगुर्ले, कुडाळ, संगमेश्वर, वैभववाडी येथे दमदार पाऊस झाल्याने कोकण चिंब झाला आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण तसेच सांगली येथे ७०, विदर्भातील मानोरा येथे ६०, पुणे जिल्ह्यातील इंदापूर, जेऊर, शिराळा येथे ५०, कोल्हापूरसहजिल्ह्यातील आजरा, शाहूवाडी, शिरोळ, चंदगड, कागल, राधानगरी, परिसरात चांगला पाऊस झाला. (प्रतिनिधी)
कोकणात मुसळधार पाऊस
By admin | Published: June 11, 2016 3:57 AM