ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 31 - केरळमध्ये दाखल झालेला मान्सून अद्याप महाराष्ट्रात पोहोचला नसला तरी, तळकोकणात मान्सूनपूर्व पावसाच्या मुसळधार सरी कोसळत आहेत. कोकणाच्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात रात्रीपासूनच पावसाने जोर पकडला असून, इथल्या नद्याही दुथडी भरुन वाहत आहेत. पावसामुळे या दोन जिल्ह्यातील काही भागात वीज पुरवठा खंडीत होण्याच्या घटनाही घडल्या आहेत.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात विशेषकरुन किनारपट्टी भागात पावसाचा जोर जास्त आहे. पावसाच्या सरींमुळे मागच्या तीन-चार महिन्यांपासून उकाडयाने हैराण झालेल्या इथल्या जनतेला दिलासा मिळाला असून, वातावरणातही सुखद गारवा निर्माण झाला आहे. कोकणाप्रमाणचे मराठवाडयात बीडमध्ये वादळी वा-यासह पाऊस सुरु आहे. सांगलीतही पावसाची संततधार सुरु आहे.
मान्सून ईशान्येकडील राज्यांतही धडकला असून, याचे श्रेय मोरा वादळाला आहे. मान्सून केरळात १ जूनला येतो. मान्सूनची उत्तरेकडील मर्यादा सध्या कोची, तोंडी, ऐझवाल, कोहिमा आणि देवमाळी येथून जात आहे. येत्या २४ तासांत मोरा वादळामुळे ईशान्येच्या राज्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल व तो त्यानंतर कमी होईल.
मान्सून अंदमानच्या समुद्रात 14 मे रोजी दाखल झाल्यानंतर 1 जून आधीच मान्सून केरळात पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मान्सून अंदमानच्या समुद्रात 20 मे पर्यंत पोहोचतो पण यंदा काहीदिवस आधी मान्सूनचे आगमन झाले. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर आठवडयाभराने महाराष्ट्रात दाखल होतो. मान्सूनच्या पुढील वाटचालीला पोषक वातावरण राहिले तर, 4 ते 5 जून पर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल. यंदाच्यावर्षी पुरेसा पाऊस होईल असे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे बळीराजा, सरकार आणि उद्योगजगताची चिंता कमी झाली आहे. भारताची अर्थव्यवस्था काही प्रमाणात मान्सूनच्या पावसावर अंवलबून आहे.
मान्सून आला कसे ठरवितात?
मान्सूनने अंदमानच्या समुद्रात प्रवेश केल्यानंतरही भारतीय भूमीपर्यंत येण्यास बराच काळ लागतो़ अंदमानपासून केरळच्या दरम्यान जवळपास १२०० किमीचा समुद्राचा भाग आहे़ त्यामध्ये सॅटेलाईटशिवाय अन्य कोणतेही हवामान केंद्र नाही़ त्यामुळे केरळमध्ये मान्सून कधी येणार, याचा अंदाज व्यक्त करणे अवघड असते़ केरळमध्ये साधारण १० मेपासून कमीजास्त पाऊस पडण्यास सुरुवात होते.
केरळमधील मिनीकॉय, अमिनी तिरुअनंतपुरम, पुनालुर, कोल्लम, आलापुजा, कोट्टायम, त्रिसूर, कोजीकोड, तलासरी, तन्नूर, कुडुलू, मंगलोर या १४ हवामान केंद्रापैकी किमान ६० टक्के केंद्रांवर सलग दोन दिवस २५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला पाहिजे हा पहिला निकष आहे़ वारा पश्चिमेकडून दक्षिणकडे वाहत असला पाहिजे व ते ४ किमी उंचीपर्यंत पोहोचले पाहिजेत़ ५ ते १० रेखांक्ष व ७० ते ७५ रेखांक्ष दरम्यान उर्जा २०० वॅटपेक्षा कमी पाहिजे, हे निकष पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी हवामान विभाग केरळमध्ये पाऊस आला, असे घोषित करते.