लोकमत न्यूज नेटवर्कपुणे/औरंगाबाद : अनुकूल वाऱ्यांअभावी थंडावलेला मान्सून राज्यात परत सक्रिय होत असून गुरुवारी औरंगाबादसह मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला. विदर्भात यवतमाळ, चंद्रपूर आणि अकोला जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला असून वीज पडल्याच्या घटनांमध्ये चौघांचा बळी गेला आहे. राज्यात आलेल्या मान्सूनची वाट अनुकूल वाऱ्यांनी रोखल्याने दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. येत्या २४ तासांत राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. मराठवाड्यात जोरदार पाऊसऔरंगाबाद तालुक्यातील लाडसावंगी परिसराला दुपारी साडेचारच्या सुमारास जोरदार पावसाने झोडपले. तब्बल तीन तास हा पाऊस बरसला. दुधना नदीच्या उगम क्षेत्रातील अंजनडोह, लिंगदरी परिसरात अतिवृष्टी झाल्याने अंजनडोह, नायगव्हाण, हातमाळी, शेलूद चारठा, लाडसावंगी, सय्यदपूर, औरंगपूर, काचनापूर या नदीकाठच्या गावचा संपर्क तुटला आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात दुपारी दीडपासून दीड तास मुसळधार पाऊस झाला़ जालना शहरासह परतूर, अंबड, बदनापूर, घनसावंगी या चार तालुक्यांत सायंकाळी जोरदार पाऊस झाला. बीड जिल्ह्यात बीड शहरासह गेवराई, परळी तालुक्यात सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. परभणी जिल्ह्यात सलग दोन दिवस पाऊस सुरू आहे. विदर्भात वीज कोसळूनचौघांचा मृत्यूविदर्भात यवतमाळ, चंद्रपूर, अकोला, जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. मूर्तिजापूर तालुक्यात (जि. अकोला) नाल्याला पूर आला. त्यात साहद शेख रफीक हा नऊ वर्षीय मुलगा वाहून गेला. यवतमाळ जिल्ह्यात पांढरकवडा तालुक्यातील आसोली येथे शेतात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. संजय नागोराव वाघमारे (५०), उमेश हरिभाऊ कुमरे (१६) अशी मृतांची नावे आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा तालुक्यातील भटाळी येथील मुरलीधर पिसे (३९) यांचा वीज पडून मृत्यू झाला. दुसरी घटना चिमूर तालुक्यातील महादवाडी येथे घडली. शेतावरून घरी परत येत असताना वीज कोसळून प्रदीप सहारे यांचा जागीच मृत्यू झाला.
मराठवाड्यात दमदार पाऊस
By admin | Published: June 16, 2017 12:49 AM