मुबई - मागील काही तासांपासून सुरु असलेल्या पावसामुळे राज्यातील काही नद्यांना पूर आला आहे. कोल्हापूरातील कुंभी नदीवरील गोठे परखंदळे पुलावर तीन ते साडेतीन फूट पाणी आल्यामुळे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे. नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर आल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने खबरदारीचा इशारा दिला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात रात्रभर धुवादार पाऊस सुरू आहे. कोल्हापूर गगनबावडा मार्गावर, मांडूकली गावाजवळ रस्त्यावर १.५ फूट पाणी आल्याने वाहतूक बंद केली आहे. कळे मार्गे येवून गगनबावडा जाणारी वाहतूक, तसेच कोल्हापूर कडून जाणारी वाहतूक थांबविली आहे. वैभववाडी कडून येणारी वाहतूक गगनबावडा येथे थांबविण्याचा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत
तर गडचिरोलीतही मुसळधार पावसामुळे पर्लाकोटा नदीला पूर आलेला आहे. त्यामुळे 100 गावांचा संपर्क तुटला आहे. आलापल्ली-भामरागड रस्ताही बंद झाला आहे. भामरागड तालुक्यातील दूरध्वनीसेवा व वीजपुरवठा ठप्प आहे. पेरमिलीजवळच्या नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने पेरमिली-भामरागड मार्ग बंद आहे.
कोकण, गोव्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस बरसत असून त्यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. धरणांच्या पाणीसाठ्यातही झपाट्याने वाढ होत असून काही धरणांमधून विसर्ग सुरू झाला आहे. ठाणे, बदलापूर, नवी मुंबई या ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असल्याने बदलापूरजवळ असलेले बारवी धरण 100 टक्के भरुन वाहू लागले आहे. नाशिक जिल्ह्यात गंगापूर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने सकाळपासूनच विसर्ग सुरू झाला आहे.
तर मुंबई शहरातही रात्रीपासून मुसळधार पावसाने जोर कायम ठेवला आहे. अंधेरी, दादर, कांदिवली, बोरिवली, मुलुंड, वरळी, चर्चगेट भागात जोरदार पाऊस पडत आहे. पुढील 2 दिवस मराठवाडा आणि विदर्भामध्ये मध्यम पावसासह एक दोन जोरदार सरींची शक्यता आहे. कोकण व गोव्यावर मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे. याशिवाय, गुजरात आणि मध्य महाराष्ट्र मध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो असा इशारा स्कायमेटने दिला आहे.