पुुणे : गेली दोन दिवसांपासून जिल्ह्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला असून, धरण क्षेत्रात दमदार हजेरी लावली आहे. १५ दिवसांपूर्वी ५0 ते ६0 टक्क्यांवर आलेली धरणे दोन दिवसांत २0 टक्क्यांपर्यंत भरली असून, वेल्हेतील गुंजवणी धरण १00 टक्के भरून वाहू लागले आहे. चासकमान धरण ८0 टक्क्यांवर गेले असून, येडगाव, वडज ही धरणेही ९0 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहेत. नीरा देवघर ६६.८१ टक्के, तर भाटघर धरण ६४.७९ टक्के भरले आहे. खडकवासला धरण साखळीत १ टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. पावसाचा जोर असाच राहिला, तर या महिन्यातच धरणं भरून वाहू लागतील.>मार्गासनी : दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधारेमुळे ४८ तासांत वेल्ह्यामध्ये १६७ मिमी पावसाची नोंद झाली. धरणक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे गुंजवणी धरण १०० टक्के भरले असल्याची माहिती गुंजवणी प्राधिकरण प्रकल्पाचे अभियंता बी. आर. पवार यांनी दिली. वेल्ह्याच्या तहसीलदार डॉ. वनश्री लाभले लाभशेटवार यांनी पोलीस यंत्रणा व प्रत्येक विभागाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. याबाबत अभियंता पवार अधिका माहिती देताना म्हणाले, की गुंजवणी धरणातील पाणी साठवण क्षमता ३.७० टीएमसी एवढी आहे. आतापर्यंत झालेल्या बांधकामाच्या १०० टक्के पाणीसाठा धरणामध्ये झाला आहे. आज सकाळपर्यंत पाणी सांडव्याला लागले होते, तर दुपारी पावसाचा जोर धरणक्षेत्रामध्ये वाढल्याने दुपारनंतर पाणी धरणाच्या सांडव्यावरून वाहू लागले आहे. आजपर्यंत गुंजवणी धरणात २.२० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गुंजवणी धरणाच्या सांडव्यामधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून, पाण्याची पातळी वाढत असल्याने तहसीलदार डॉ. वनश्री लाभशेटवार यांनी पोलीस यंत्रणा व सर्व विभागप्रमुखांना नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्यासाठी कळविण्याकामी सूचित करण्याचे आदेश दिले आहेत व त्याबाबतचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. गुंजवणी धरण जरी १०० टक्के भरले असले, तरी गुंजवणीमधील धरणग्रस्तांचे १०० टक्के पुनर्वसन झाले नसल्याने धरणग्रस्तांचे पुनर्वसन लवकरात लवकर व्हावे, अशी मागणी गुंजवणी धरणग्रस्त करीत आहेत. (वार्ताहर)>तालुक्यात काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. शेवटच्या टप्प्यात आलेल्या लावण्या पावसाअभावी रखडल्या होत्या. तर, डोंगराजवळील व पाण्याच्या कमतरतेअभावी लावणी झालेल्या भातखाचरांमध्ये पाणी कमी पडू लागले होते; परंतु गेल्या दोन दिवसांत वेल्हे तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या पावसामुळे भातशेती बेणणीला व खते टाकण्याची शेतकऱ्यांमध्ये लगबग सुरू झाली आहे. तर, धरण १०० टक्के भरले आहे.