खामगाव/चिंचपूर : चिंचपूर, गणेशपूर भागात बुधवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे गणेशपूर येथील नाल्याच्या काठावर असलेल्या घर व हॉटेलमधील साहित्य वाहून गेले असून, गावात पाणी शिरले आहे.
खामगाव तालुक्यातील वैरागड, चिंचपूर, गणेशपूर भागात बुधवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला. तसेच नागरिकांच्या घरात पाणी शिरले. गणेशपूर येथे मस नदीकाठी घर असलेल्या परसराम तुळशीराम मेहेत्रे यांच्या घरातील संपूर्ण साहित्य वाहून गेले. तसेच अजाबराव कोकरे यांच्या हॉटेलमधील सिलिंडरसह अन्य साहित्य वाहून गेल्याची माहिती पोलिस पाटील मंगेश कोकरे यांनी दिली. मस नदीला आलेल्या पुरामुळे नदिच्या काठावर असलेली शेतातील माती वाहून गेली. गणेशपूर येथील शेषराव पवार, राम पोफळकर, चतकार, उन्हाळे, हबीब, अनंता गावंडे, बाळू गावंडे, शेख जावेद, संतोष पारसकर यांच्यासह इतरांच्या घराचे पुराने नुकसान झाले आहे. चिंचपूर गावालगत उंद्री रस्त्यावर असेलल्या नाल्याच्या पुलावरून पाणी वाहले. या पुलावर असलेल्या नागरिकांना दोरीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. तसेच चिंचपूरच्या पाझर तलावात एक जेसीबी अडकली आहे.
दोन तास बरसला धो- धो पाऊस
चिंचपूर, वैरागड भागात तब्बल दोन तास ढगफुटीसारखा पाऊस झाल्याचे नागरिकांनी सांगितले. ६.३० ते ८.३० वाजेपर्यंत या भागात जोरदार पाऊस झाला.