पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेली द्रोणीय स्थिती, दक्षिण गुजरातपासून मध्य प्रदेशापर्यंत निर्माण झालेल कमी दाबाचे क्षेत्र आणि पश्चिमबंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र या तिहेरी वातावरणाचा परिणाम म्हणून राज्यात पुढील १० ऑगस्टपर्यंत सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. त्याचवेळी पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यातील घाट परिसरात ७, ८ व ९ ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे़. नाशिक जिल्ह्यातही ८ ऑगस्टला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे़. त्यामुळे अगोदरच पुराने वेढलेल्या या जिल्ह्यात आणखी पाऊस होणार असल्याचे प्रशासनासह नागरिकांना सर्तकतेचा आदेश देण्यात आला आहे़. याबाबत पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ़ अनुपम कश्यपि यांनी सांगितले की, सध्या देशात तीन वेगवेगळ्या सिस्टिम तयार झाल्या आहेत़. अरबी समुद्रात द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने कोकणात अतिजोरदार पाऊस होत आहे़. याचवेळी पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. येत्या २४ तासात ते आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे़. ४८ तासात त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे़. सध्या ते ओडिशाच्या बालासोरेपासून १६० किमी दूर आहे़. त्याचे चक्रीवादळात रुपांतर झाल्यास त्यामुळे बंगाल, ओडिशा, झारखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणासह विदर्भ, मराठवाड्याला चांगला पाऊस मिळण्याची शक्यता आहे़. विदर्भात ८ ऑगस्टला अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून १० ऑगस्टनंतर पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे़. मराठवाड्यातही सर्वदूर अधिकाधिक ठिकाणी पावसाची शक्यता आहे़. ८ ऑगस्टला बहुतांश ठिकाणी पाऊस होऊ शकेल़. १० ऑगस्टनंतर पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असल्याचे डॉ़ कश्यपि यांनी सांगितले़. कोकण, गोव्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाला आहे़. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस होत आहे़. मराठवाड्यात कंधार ६०, निलंगा ३०, कन्नड, लोहारा, उमरगा २० मिमी पाऊस झाला असून अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला आहे़. विदर्भात अनेक ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली होती़. मंगळवारी दिवसभरात महाबळेश्वरात तब्बल १६६ मिमी तर विदर्भातील गोंदिया १०१ मिमी पावसाची नोंद झाली आहे़. कोल्हापूर ६०, सातारा २४, उस्मानाबाद १४, औरंगाबाद ७, अमरावती २४ मिमी पावसाची नोंद झाली आहे़.
- ७ ऑगस्ट रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे़.
- पश्चिम किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे़.
- ८ ते १० ऑगस्ट दरम्यान कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे़.
- पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील घाट परिसरात येत्या ७, ८ व ९ ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी अतिवृष्टी म्हणजेच २४ तासात २०४ मिमीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ . त्यामुळे आधीच पुराने वेधलेल्या या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्यास हाहा:कार उडण्याची शक्यता दिसून येत आहे़. त्याचबरोबर १० ऑगस्टला अतिजोरदार पावसाची शक्यता आहे़.
- नाशिक जिल्ह्यातील घाट क्षेत्रातही ८ ऑगस्टला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे़. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या २४ तासात
अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.