Maharashtra Weather Forecast ( Marathi News ) : राजधानी मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. अशातच हवामान खात्याकडून कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसंच मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, अशी माहितीही देण्यात आली आहे.
प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे, मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळू शकतो. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (३०-४० किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबईत कसं असेल वातावरण?
पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार, शहर आणि उपनगरात मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या शक्यतेसह सर्वसाधारणपणे ढगाळ आकाश राहील, तर कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३१ डिग्री सेल्सिअस आणि २६ डिग्री सेल्सिअसच्या आसपास असेल.
पुण्याबाबत काय आहे हवामान खात्याचा अंदाज?
पुणे जिल्ह्यांत पुढील पाच दिवसांत चांगला पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून तापमान २६ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात ३१ जुलै रोजी ५२ मिमी, १ ऑगस्ट रोजी ४९ मिमी, २ ऑगस्ट रोजी ८० मिमी, ३ ऑगस्ट रोजी ९५ मिमी आणि ४ ऑगस्ट रोजी १०० मिमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा पाऊस भात उत्पादक शेतकऱ्यांना फायद्याचा ठरणार आहे.