मुंबई, दि. 16- राज्यात येत्या तीन दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. येत्या शुक्रवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात पावसाचं पुन्हा आगमन होण्याची दाट शक्यता आहे. परिणामी येता वीक एन्ड मस्त पावसात चिंब न्हाऊन निघण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मुंबई आणि उपनगरांमध्ये पुढच्या 24 तासात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
वेधशाळेच्या अंदाजानुसार खरंच नभ उतरू आले, तर शेतक-यांच्या डोईवरलं चिंतेचं मळभही काही प्रमाणात दूर होईल. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पीकं करपल्यानं हतबल झालेल्या शेतकऱ्याला या पावसाने पुन्हा दिलासा मिळणार आहे.
मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाने दडी मारली आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातही हेच चित्र पाहायला मिळतं आहे. ऐन मौसमात पावसाने अचानक दांडी मारल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य लोकही चिंतेत आहेत. त्यामुळे मोठ्या विश्रांतीनंतर येणाऱ्या या पावसाची सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत.
आणखी बातम्या वाचा
अखेर विद्यार्थ्यांच्या पदरी निराशाच
सर्वांगसुंदर मुंबईसाठी कटिबद्ध - महापौर
पेरणीनंतर अचानक गायब झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. लातूरच्या औसा तालुक्यात 2 भावांनी साडे सहा एकरात सोयाबीन पेरलं, पण पावसाने दडी मारल्यानं 2 लाख खर्चून पेरलेल्य़ा सोयाबीनचं नुकसान झालं. त्यामुळे पेरणीचं नुकसान होऊ नये,यासाठी शेतकऱ्याचं पावसाकडे लक्ष लागलं आहे.
एकीकडे महाराष्ट्रात पावसाने दडी मारलेली असताना दुसरीकडे बिहारमध्ये पावसाचं थैमान बघायला मिळतं आहे. गेल्या काही दिवसांपासून बिहार आणि नेपाळच्या सीमेलगतच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे. त्यातच नेपाळकडून धरणांमधील पाणी सोडण्यात येत असल्याने परिस्थिती अधिकच बिघडली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची पथकं मदत आणि बचाव कार्यात गुंतली आहेत. तसंच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारकडून लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे.बिहारमधील पुरस्थितीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा वाढता असून, या महापुरामुळे आत्तापर्यंत 56 जणांचा मृत्यू झाला आहे. प्राप्त आकडेवारीनुसार अररिया येथे 20, किशनगंजमध्ये 8, पूर्व चंपारण्य जिल्ह्यात 3, पश्चिम चंपारण्य जिल्ह्यात 9, दरभंगा जिल्ह्यात 3, मधुबनी जिल्ह्यात 3 सीतामढी येथे 5, माधेपुरा येथे 4 आणि शिवहर येथे एकाचा मृत्यू झाला आहे.