ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - येतो येतो म्हणत अखेर पावसानं महाराष्ट्रासह मुंबईत दमदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसानं हिंदमाता, किंग्ज सर्कल सारख्या सखल भागांत पाणी साचलं आहे. नैर्ऋत्य मोसमी पावसाने (मॉन्सून)रविवारी दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात प्रवेश केला.
मान्सूनने शुक्रवारी पूर्व विदर्भातून राज्यात प्रवेश केला असून, येत्या ४८ तासांत मान्सून संपूर्ण राज्य व्यापण्यास अनुकूल परिस्थिती असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे. कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.
(मान्सून अरबी समुद्रातून पुढे सरकला, कोकणात पावसाच्या सरी)
मॉन्सूनची उत्तरी सीमा रविवारी आणखी उत्तरेकडे सरकली आहे. त्याची वाटचाल मध्य अरबी समुद्र, संपूर्ण गोवा, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य प्रदेशचा पूर्वेकडील भाग आणि मध्य -पूर्व उत्तर प्रदेशाचा काही भाग, विदर्भ व बिहारच्या आणखी काही भागात व उत्तर अंतर्गत कर्नाटक, छत्तीसगड, तेलंगणा आणि झारखंडच्या उर्वरित भागात झाली आहे.पुढील ४८ तासांत मध्य अरबी समुद्र, कोकण, मराठवाडा, विदर्भ, पूर्व मध्य प्रदेश व बिहारच्या उर्वरित भागात, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व उत्तर प्रदेशाच्या आणखी काही भागात व पश्चिम मध्य प्रदेशाच्या काही भागात मान्सून दाखल होण्यास अनुकूल परिस्थिती आहे.
(विदर्भाच्या वाटेने मान्सून पोहोचला महाराष्ट्रात)
गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांपैकी नागपूर १३, सोलापूर ३२२, अहमदनगर २१५, परभणी १२४, पणजी २१५, भिरा ८, रत्नागिरी २६, सांगली १३ मिमी पाऊस पडला. रविवारी दिवसभरात अलिबाग १६, पणजी ७, रत्नागिरी ८, मुंबई ३, महाबळेश्वर १, औरंगाबाद २, परभणी ७, सोलापूर ३, पुणे ५, लोहगाव ३ मिमी पावसाची नोंद झाली़. पुढील दोन दिवसात कोकण, गोवा, मराठवाडा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. २० जून रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २१ ते २३ जून दरम्यान कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ पुणे व परिसरात पुढील काही दिवस पावसाच्या अधूनमधून सरी पडण्याची शक्यता आहे.