मुंबई : राज्यात पावसाच्या जोरधारा कायम असून अनेक नदी-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक धरणांचे दरवाजे उघडल्याने परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. राज्यात गेल्या दहा दिवसांत पावसाच्या कहरात एकूण ८४ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी नागपुरात पुरात गाडी वाहून गेल्याने ६ जणांना जलसमाधी मिळाली तर पुणे जिल्ह्यात ४ जणांचा बळी गेला आहे. खान्देशात चार जणांचा मृत्यू झाला आहे.
अतिमुसळधार पावसाचा इशारामुंबईसह राज्यभरात हवामानात उल्लेखनीय बदल होत असून, ओडिशा आणि लगतच्या परिसरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून पुढील चार दिवस कोकण किनारपट्टीचा भाग, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरासह मराठवाड्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर बुधवारी मुंबईसह ठाण्याला ऑरेंज अलर्ट तर पालघर, रायगड, नाशिक आणि पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे.
पुढील चार दिवस ही स्थिती कायम राहील, अशी शक्यता आहे. पुढील चार दिवस कोकणातील किनारीपट्टी भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. डॉ. जयंता सरकार, प्रमुख, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग