बदलापूर: गेल्या तीन दिवसापासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूर आला होता बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटे मुसळधार पाऊस झाल्याने या नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. तसंच उल्हास नदीच्या जवळ असलेले रेल्वेरुळही पाण्याखाली गेले होते.
उल्हास नदी दुथडी भरून वाहत असून गुरुवारी पहाटे या नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. १७.५० मीटर ही उल्हास नदीची धोक्याची पातळी असून गुरुवारी पहाटे उल्हास नदीने १८ मीटर पाण्याची पातळी गाठली होती. त्यामुळे नदीकाठच्या संकुलामध्ये तळ मजले पाण्याखाली आले होते. उल्हास नदीच्या किनार्यावर असलेल्या रमेशवाडी हेंद्रे पाडा आणि वालिवली परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी गृह संकुलांमध्ये आले होते. नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.
उल्हास नदीच्या काठावर असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलशुद्धीकरण केंद्रात देखील पाणी आल्याने जलशुद्धीकरण केंद्र देखील बंद करण्यात आले आहे. बदलापूर- वांगणी रेल्वे स्थानकांच्या दरम्यान उल्हास नदीच्या किनार्यावर असलेले रेल्वे रूळ देखील पाण्याखाली आले होते त्यामुळे रेल्वेवर देखील त्याचा परिणाम झाला.