मुंबई : अनंत चतुर्दशीपासून मुसळधार हजेरी लावणाऱ्या पावसामुळे मुंबई पुन्हा एकदा खड्ड्यात गेली आहे. त्यामुळे मतदारांमध्ये रोष वाढत असल्याने आगामी निवडणुकीच्या तयारीला लागलेले नगरसेवक धास्तावले आहेत. किमान निवडणुकीपूर्वी मुंबई खड्डेमुक्त करण्याचे साकडे त्यांनी प्रशासनाला घातले आहे. मात्र पावसाला दोष देत प्रशासनानेही हात वर केल्याने नगरसेवक हवालदिल झाले आहेत.मुंबई खड्डेमुक्त करण्याचे वचन पालिका पूर्ण करू न शकल्याने गणरायाचे आगमन खड्ड्यातून झाले. विसर्जनापूर्वी मुंबईत सर्व खड्डे भरले जातील, हा शब्दही प्रशासनाने पाळला नाही. त्यातच अनंत चतुर्दशीपासून मुंबईत सतत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने मुंबई खड्ड्यात गेली आहे. बुजवलेल्या खड्ड्यांमधील मालही पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी वाढली असून अपघाताचा धोकादेखील वाढला आहे. याचे तीव्र पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी उमटले. नागरिकांची गैरसोय होत आहे. मुंबईकरांमध्ये नाराजी वाढत आहे. मात्र तक्रार करूनही पालिका दखल घेत नाही. जनतेला मूर्ख बनविण्याचे काम पालिका करीत आहे, अशी नाराजी मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी व्यक्त केली. गेल्या वर्षी ज्या ठिकाणी खड्डे भरले होते, तेथेच पुन्हा खड्डे पडले आहेत. तरीही पालिकेला यावर अद्याप रामबाण उपाय सापडलेला नाही, असा संताप समाजवादीचे गटनेते रईस शेख यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)>विरोधकांचा सभात्यागनगरसेवकांनी खड्ड्यांच्या तक्रारी करीत लवकरात लवकर खड्डे भरण्याची मागणी लावून धरली. मात्र खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. पण पावसापुढे नाइलाज होतोय, अशी सबब देत प्रशासनाने आपला बचाव केला. खड्डे भरण्याच्या कामात पाऊस व्यत्यय आणत आहे, असा बचाव अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी केला. प्रशासनाच्या या उत्तरामुळे नाराज पक्षांनी सभात्याग केला.
मुसळधार पावसात रस्ते गेले वाहून
By admin | Published: September 22, 2016 2:42 AM