पुणे :कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. घाटमाथ्यावरील धरणक्षेत्र मात्र कोरडेच आहे. रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार, तर राज्यात इतरत्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
रविवारी सकाळपर्यंत मागील २४ तासांत लांजा २७५, रत्नागिरी २२३, श्रीवर्धन २०७, राजापूर १६९, हरणाई १६४, दापोली १५८, गुहागर १३४, संगमेश्वर, देवरूख १३०, कुडाळ ११७, वालपोई १०६ मिमी पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील गगनबावडा ७०, चंदगड ६०, अकोले ४७, राधानगरी ४०, हर्सूल ३२, येवला ३०, पाथर्डी २९, शाहूवाडी, पन्हाळा, चास २४, महाबळेश्वर २३ मिमी पावसाची नोंद झाली होती.
मराठवाड्यातील मुखेड ७६, हिमायतनगर ७०, गंगाखेड, अहमदपूर ४६, चाकूर ३९, जळकोट, पूर्णा ३८, माजलगाव ३२, सिल्लोड ३० मिमी पाऊस झाला. विदर्भातील तेल्हारा २८, लाखनी २४, देवरी २१, ब्रह्मपुरी १६ मिमी पाऊस झाला. इतरत्र हलक्या पावसाची नोंद झाली आहे. कोयना (पोफळी) ३०, नवजा १४, ताम्हिणी १२, डुंगरवाडी ७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला असून, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.