नागपूर : राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढला होता. तर राज्यात अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही जिल्ह्यांना यलो तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील २६ तारखेपर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
नागपुरात आज पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु आहे. शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे. तसेच, अनेक ठिकाणी विजांमुळे सेटटॉप बॉक्स, टीव्हीच्या आयसी उडाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. दरम्यान, आज राज्यातील रायगड, भंडारा, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
याचबरोबर, आज राज्यातील सहा जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक, जळगाव, जालना, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित इतर जिल्ह्यांमध्ये मात्र आज ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय, पुढील दोन दिवसांत राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
गेल्या २४ तासांमध्ये पुण्यात जोरदार पावसाने हजेरी लावली तर मुंबईच्या काही भागांतही पाऊस बरसला. दरम्यान, कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होऊन ते चक्रिय स्थितीत आहे. ते पश्चिम झारखंड आणि लगतच्या भागावर आहे. तसेच कमी दाबाची रेषा ही सिक्कीम ते दक्षिण महाराष्ट्रापर्यंत आहे. यामुळे पुढील ४८ तासांत राज्यात मॉन्सून सक्रिय ते अतिसक्रिय राहणार आहे.