औरंगाबाद : मराठवाड्याच्या काही भागांत गेल्या चोवीस तासांत मुसळधार पाऊस पडला. लातूर, नांदेड जिल्ह्यांत काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. पावसामुळे तूर, सोयाबीनला दिलासा मिळाला तरी काढणीला आलेल्या मूग व उडीद पिकांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी पिकांत पाणी साचल्याने सोयाबीनलाही धोका निर्माण झाला आहे़नांदेड जिल्ह्यातील ४ तालुक्यांतील ८ महसूल मंडळांत सोमवारी अतिवृष्टीची नोंद झाली. बिलोली तालुक्यातील सगरोळी मंडळात ८६.९० मिमी. पाऊस झाला. आदमपूर मंडळात ९४.५० व लोहगाव मंडळात ९३.०० मिमी. पाऊस झाला. मुखेड तालुक्यात चांडोळा ९७.७५ मिमी. आणि देगलूर तालुक्यात ७५.७५ मिमी., खानापूर मंडळात ८३.७५ मिमी. आणि शहापूर मंडळात सर्वाधिक १०६.२५ मिमी. पाऊस झाला. लातूर जिल्ह्यात चार महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली.त्यात देवणी ८४.५, बोरोळ १२७.५, मोघा ८०.५ आणि नागलगाव महसूल मंडळात ७७.५ मिमी. पाऊस झाला.बीड जिल्ह्यात शिरूर कासार येथील सिंदफणा धरणदेखील मागील काही दिवसांपासून सांडव्यावरून वाहत आहे. सिंदफणा नदीची महापुराकडे वाटचाल सुरू आहे.परभणी जिल्ह्यातील पालम शहराजवळून वाहणाऱ्या लेंडी नदीला मंगळवारी दुपारी पूर आल्याने नदीपलीकडील पाच गावांचा संपर्क तुटला. गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्प तुडुंब झाला. अर्ध्या उस्मानाबाद जिल्ह्यात मंगळवारी पहाटे दमदार पावसाने हजेरी लावली आहे़ तेरणा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. जालना शहर व परिसरात मंगळवारी सायंकाळी पावसाचे जोरदार पुनरागमन झाले.
मराठवाड्याच्या काही भागांत अतिवृष्टी; बीड जिल्ह्यात ५ गावांचा संपर्क तुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 2:37 AM