मुंबई - गुरुवारी रात्रीपासून मुंबई, ठाणे जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाट अन् ढगांच्या गडगडाटासह रात्रभर पावसाने शहरात धुमाकूळ घातला आहे. मुंबईमध्ये दादर, वरळी, लोअर परेळ, चर्चगेट, बोरिवली, कांदिवली, अंधेरी, वांद्रे, धारावी, सायन या परिसरात जोरदार पाऊस पडत आहे.
तर ठाणे जिल्ह्यात शहापूर, भिवंडी तसेच ग्रामीण भागातही पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत पडणाऱ्या पावसामुळे रेल्वे वाहतूक उशिराने सुरु आहे. पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, क्यार आणि महा वादळाचा धोका टळला असला तरी बंगालच्या उपसागरात आणखी एक वादळ निर्माण झाल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. बुलबुल असं या वादळाचं नावं आहे.
स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, सांताक्रुझ वेधशाळेत नोव्हेंबर २०१९च्या पहिल्याच दिवशी शहराच्या जवळच असलेल्या चक्रीवादळ ‘महा’मुळे ४६ मिमी पावसाची नोंद झाली असून, २०१० नंतरचा हा जास्त पाऊस असलेला यंदाचा नोव्हेंबर महिना आहे. ऑक्टोबरच्या मध्यानंतर पाऊस कोसळत नाही. क्वचित हलक्या सरी कोसळतात. मात्र या वर्षी नोव्हेंबर महिन्यातही मुसळधार पाऊस कोसळला.
सांताक्रुझ वेधशाळेत नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी शहराच्या जवळच असलेल्या चक्रीवादळ ‘महा’मुळे ४६ मिमी पावसाची नोंद झाली. नोव्हेंबरमध्ये मुंबईत सरासरी ९.९ मिमी पाऊस कोसळतो. मात्र शहरात यापूर्वीच ४६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. २०१० नंतरचा जास्त पाऊस असलेला नोव्हेंबर महिना आहे. नोव्हेंबर २०१० मध्ये मुंबईत ४७.२ मिमी पाऊस कोसळला होता. दरम्यान, आणखी पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याने २०१० सालचा विक्रम मोडला जाऊ शकतो.