मुंबई - एकीकडे उष्णता वाढत असतानाच आज संध्याकाळी राज्यातील विविध भागांना मुसळधार पावसाने झोडपून काढले. मुंबईजवळील पनवेल, डोंबिवली, अंबरनाथ बदलापूर या शहरांसह, सिंधुदुर्ग, चिपळूण आदी भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना दिलासा मिळाला असला तरी फळबागा आणि पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज सकाळपासून मोठ्याप्रमाणात उष्णता जाणवत असल्याने मुंबई आणि आसपासच्या परिसरातील नागरिक हैराण झाले होते. त्याचदरम्यान, संध्याकाळी डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परिसरात अचानक अंधारून आले आणि सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळू लागला. संध्याकाळी पाच साडेपाचच्या सुमारास सुरू झालेला पाऊस बराच वेळ सुरू होता.
डोंबिवलीत पावसाची सर बरसली प्रचंड उकाडा असल्याने डोंबिवलीकर हैराण असतानाच शहरात मंगळवारी अचानक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे डोंबिवलीकरांसह चाकर मान्यांची एकच त्रेधातिरपीट उडाली. संध्याकाळी अचानक पाच वाजण्याच्या सुमारास आधी प्रचंड धूळधाण झाली, त्यामुळे शहरातील रस्ते धुलिने माखले होते. पावसाला सुरुवात झालेली नव्हती पण तरीही मातीचा सुगंध सर्वत्र पसरल्याने पावसाचा अंदाज ज्येष्ठांनी वर्तवला होता. त्यात संध्याकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी पावसाचा शिडकावा झाला, आणि पुढच्या पाच मिनिटात अवकाळी पावसाने मोठी हजेरी लावत रस्ते अलेचिंब केले. साधारण 10 मिनिटे पावसाची सर बरसली, संध्याकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी पावसाचा जोर ओसरला. पण आकाश ढगाळलेले होते. पावसाची सर बरसली तरीही वातावरणात उष्मा कायम होता. ढगांचा गडगडाट देखील झाला. पावसाचा आणि धूळधाणीमुळे महावितरणने खबरदारीची उपाययोजना घेत वीजपुरवठा खंडित केला होता. स्टेशन परिसर, फडके रोड, फतेह अली, भगतसिंग, मेहता रोड आदी सर्व ठिकाणी वजज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिक हैराण झाले होते. उद्या बुधवारी अक्षय तृतीया असल्याने व्यवहारात तेजीची अपेक्षा असतानाच अचानक पडलेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांचा हिरमोड झाला. तसेच शहरात होणारे रिक्षा आंदोलनावरही त्याचा परिणाम।झाला. संध्याकाळी उशिरापर्यंत ढगांचा गडगडाट सुरू होता.
बदलापूरात सुसाटय़ाच्या वा-यासह अवकाळी पावसाची हजेरी दुपारी 1 वाजता उन्हाचा पारा हा 42 अंशावर असतांना सायंकाळी 5.30 नंतर बदलापूरात जोरदार पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसाचा कहर तासभर राहिला. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असुन लग्न सराईमध्ये देखील व्यक्तय आला आहे. गेल्या दोन दिवसांपासुन उन्हाचा पारा चढलेला असतांना आज दुपारी बदलापूरसह अंबरनाथमध्ये 42 अंशाच्या वर उन्हाचा पारा गेला होता. उकाडय़ाने सर्व हैराण असतांना सायंकाळी 5.30वाजता बदलापूरात सुसाटय़ाच्या वा-यासह पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे सर्व जनजिवन विस्कळीत झाले होते. जोरदार पाऊस झाल्याने रस्त्यावर पाणी साचले होते. तर सर्वात मोठी कोंडी झाली ती लग्न समारंभांची. मंगळवार आणि बुधवार हे दोन्ही दिवस लग्न चे मुहुर्त असल्याने बदलापूरात अनेक ठिकाणी लग्न समारंभ होते. या पावसामुळे लग्नसमारंभातही व्यत्यय आला आहे. बदलापूरातच्या काह भागात लहान गारांसह काही काळ पावसाने हजेरी लावली होती. मात्र नंतर लागलीच जोरदार सरींसह पाऊस पडल्याने नागरिाकंनी घरी राहणो पसंत केले. बदलापूरात पावसाने हजेरी लावलेली असतांना अंबरनाथमध्ये मात्र सुसाटाचा वा-याचा सामना करावा लागला. वा-यामुळे सर्वत्र धुळ पसरली होती. सायंकाळी 6 नंतर पावसाच्या हलक्या सरीच पडल्या.